मुंबई : सीता नवमी (Sita Navami 2023) यंदा 29 एप्रिलला म्हणजेच आज साजरी होत आहे. सीता नवमी ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरी केली जाते. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की या दिवशी स्त्री किंवा पुरुषाने माता सीतेची पूजा केल्यास त्यांची सर्व संकटे दूर होतात. या दिवशी माता सीता त्रेतायुगात पुष्य नक्षत्रात अवतरली होती आणि म्हणूनच या दिवशी सीता नवमी साजरी केली जाते. सीता नवमीच्या दिवशी माता सीतेची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. यासोबतच हा दिवस आपल्या जीवनातून कोणत्याही प्रकारचे रोग आणि कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी देखील खूप शुभ मानला जातो.
उदयतिथीनुसार सीता नवमी 29 एप्रिलला म्हणजेच आज साजरी केली जात आहे. सीता नवमी 28 एप्रिल रोजी म्हणजेच काल संध्याकाळी 04:01 वाजता सुरू झाली आहे आणि ती 29 एप्रिल रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 06:22 वाजता समाप्त होईल. सीता नवमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 10.59 ते दुपारी 01.38 पर्यंत असेल. म्हणजे पूजेचा कालावधी 02 तास 38 मिनिटांचा असेल. यासोबतच आज रवि योगही तयार होणार आहे, जो दुपारी 12:47 ते पहाटे 05:42 पर्यंत असेल.
सीता नवमीच्या दिवशी वैष्णव लोक माता सीता आणि भगवान श्रीरामाची पूजा करतात. तसेच उपवास देखिल करतात. या दिवशी पूजा केल्याने दान केल्यासारखे फळ मिळते. याशिवाय सीता नवमीच्या दिवशी केलेली उपासना विवाहीत स्त्रीचे दीर्घायुष्य, संततीप्राप्ती, घरातील कलह व संकटे दूर करणे, निरोगी आयुष्य इत्यादीसाठी अत्यंत फलदायी असते. याशिवाय सीता नवमीच्या दिवशी पूजा केल्यानंतर दान अवश्य करावे. हिंदू धर्मात प्रत्येक पूजा व्रतानंतर दान केले जाते. अशा स्थितीत सीता नवमीच्या दिवशी दिलेले दान हे चार धाम यात्रा इतकेच फलदायी असल्याचे मानले जाते.
या दिवशी सकाळी लवकर स्नान करून देवघरात दिवा लावावा. उपवास करायचा असेल तर दिवा लावून व्रताचा संकल्प करावा. सीता नवमीच्या दिवशी व्रत केल्यास विशेष फळ मिळते. यानंतर पूजास्थळी देवदेवतांना गंगेच्या पाण्याने स्नान करावे. माता सीता आणि भगवान राम यांचे ध्यान करावे.
या दिवशीच्या पूजेमध्ये रामासह माता सीतेची आरती करावी. पूजेत प्रसादाचा समावेश करावा. मात्र, प्रसादामध्ये केवळ सात्विक अन्नच घेणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय प्रसादामध्ये कोणत्याही गोड पदार्थाचा समावेश केल्यास ते खूप शुभ असते. याशिवाय या दिवशीच्या पूजेमध्ये तांदूळ, उदबत्ती, दिवा, लाल रंगाची फुले यांचा समावेश असावा.
मिथिला राज्यात बराच काळ पाऊस पडला नाही, त्यामुळे तेथील लोक आणि राजा जनक खूप चिंतेत होते. तेव्हा राजा जनकाने ऋषीमुनींना या समस्येवर उपाय विचारला, तेव्हा त्यांनी राजा जनकाला सांगितले की, वैदिक विधी करून तुम्ही स्वतः शेत नांगरा म्हणजे, मग पाऊस पडेल आणि दुष्काळ संपेल. ऋषीमुनींच्या सूचनेनुसार राजा स्वतः नांगरणी करू लागला. नांगरणी करताना त्याचा नांगर कलशावर आदळला, त्यात एक अतिशय सुंदर मुलगी होती.
राजा जनक निपुत्रिक होता, त्यामुळे त्या मुलीला पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने ती मुलगी दत्तक घेऊन तिला घरी आणले. राजाने त्या मुलीचे नाव सीता ठेवले. ज्या दिवशी राजा जनकाला ती लाडकी मुलगी सीता मिळाली, ती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी होती. तेव्हापासून हा दिवस सीता नवमी किंवा जानकी नवमी या नावाने साजरा केला जाऊ लागला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)