विनायक डावरुंग, मुंबई : प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत राम मंदिराचं (Ram Mandir) स्वप्न साकारणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात हा दिवस उत्साहासारखा साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडूनदेखील विशेष तयारी करण्यात आली आहे. राज्यातसुद्धा हा सोहळा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सात दिवस मुंबईच्या प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
रामलललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव हा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्धाटन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती राहाणार आहे.
राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची मोठी फ्रेम, राम मंदिराची प्रतिकृती आणि रोषणाई करणार आहे. अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया, रामायण मालिकेत रामाची भुमीका साकारणारे अरुण गोविल यांचीही विशेष उपस्थिती राहाणार आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्रातही रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. यासाठी कार्यकर्ते आणि पदाधीकारीही तयारीला लागले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.