आज परिवर्तनी एकादशी (Pariwartani Ekadashi) आहे. आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू (Bhagwan Vishnu) आज कूस बदलवितात. या एकादशीला पद्म एकादशी किंवा कर्मधर्म एकादशी असेही म्हणतात. परिवर्तनी एकादशीला धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्व आहे, कारण चातुर्मासात जेव्हा भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत असतात, त्याच दरम्यान ते भाद्र शुक्ल एकादशीच्या दिवशी कूस बदलतात. कूस बदलविल्याने देवाची स्थिती बदलते, म्हणून या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात. यंदा परिवर्तनी एकादशी 6 सप्टेंबरला आहे. या एकादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती जाणून घेऊया.
एकादशी तिथी 6 तारखेला पहाटे 5:55 वाजता सुरू होत आहे आणि 7 सप्टेंबरला पहाटे 3:05 वाजता संपत आहे. त्यामुळे पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानल्या जाते त्यामुळे एकादशीचे व्रत 6 सप्टेंबरलाच असेल.
विष्णु पुराणात परिवर्तनी एकादशीचे विशेष महत्त्व सांगितल्या गेले आहे. काळत नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पद्म एकादशीचे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. या एकादशीला भगवान विष्णूचे ध्यान करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होऊन शेवटी मोक्ष प्राप्त होतो, अशीही मान्यता आहे.
परिवर्तनी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. पिवळे वस्त्र परिधान करून लाकडी चौरंगावर पिवळे वस्त्र टाकावे. केळीच्या पानांनी सजावट करावी. भगवान विष्णूंच्या प्रतिमेची स्थापना करावी. देवाला पंचामृताने अभिषेक करावा. पिवळे वस्त्र, पिवळी फुले, तुळशीची डहाळी व नैवैद्य अर्पण करावे. यानंतर मनात 11 वेळा श्री विष्णूंचा जप करावा. ध्यान करताना एकादशी व्रत करण्याचा संकल्प करावा. एकवेळचा उपवास करावा. या दिवशी गरजू व्यक्तीला अन्न, कपडे, छत्री, चपला दान केल्याने विशेष पुण्य मिळते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)