आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहण ही महत्वपूर्ण खगोलीय घटना मानली जाते. सूर्याला आत्म्याचा कारक मानल्यामुळे ज्योतिषशास्त्रातही याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्याशी संबंधित कोणतीही हालचाल होते तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर राहणाऱ्यांवर होतो. त्यामुळे केवळ वैज्ञानिकच नाही तर ज्योतिषीही सूर्यग्रहणाबाबत सतर्क असतात. या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे कन्या राशी आणि हस्त नक्षत्रात होणार आहे. वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाशी संबंधित सर्व खास माहिती जाणून घेऊया.
भारतात सूर्य ग्रहण दिसणार का ?
आज आश्विन कृष्ण पक्षातील अमावस्येच्या तिथीला या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्य ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग, प्रशांत महासागर, अटलांटिक, आर्क्टिक, चिली, पेरू, होनोलुलु
अंटार्क्टिका, अर्जेंटिना, उरुग्वे, ब्युनोस आयर्स, बेका बेट, फ्रेंच पॉलिनेशिया महासागर, तसेच उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग, फिजी, न्यू चिली, ब्राझील, मेक्सिको आणि पेरू येथे काही ठिकाणी दिसणार आहे.
भारतीय वेळेनुसार वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आज लागेल. आज रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी हे ग्रहण लागणार असून 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3 वाजून 17 मिनिटांनी ते संपेल. या सूर्यग्रहणाची मध्यवर्ती वेळ रात्री 12.15 वाजता असेल.
सूर्यग्रहणाचा सुतक काळ मान्य असेल की नाही ?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. म्हणजेच या ग्रहणाचा देशावर कोणताही शारीरिक, आध्यात्मिक प्रभाव, सुतक प्रभाव किंवा कोणत्याही प्रकारचा धार्मिक प्रभाव होणार नाही. या ग्रहणादरम्यान, भारतात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी सामान्य दिनचर्या असेल. शास्त्रानुसार जिथे ग्रहण होते आणि जिथे ग्रहण दिसते तिथेही त्याचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने त्याचा भारतातील लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
यावेळी कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहणाच्या वेळी राहूची पूर्ण दृष्टी सूर्यावर असेल. याशिवाय सूर्याचा षडाष्टक योगही शनिसोबत तयार होईल आणि केतूही सूर्यामध्ये असेल. तसेच या ग्रहण काळात सूर्य, चंद्र, बुध आणि केतू यांचा संयोग होईल. मीन आणि कन्या राशीत राहू आणि केतूचा अक्ष प्रभावशाली होईल. यामध्ये सूर्य, मंगळ आणि केतू यांचा प्रभाव आहे.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि पृथ्वीच्या एका भागावर अंधार होतो. याला सूर्यग्रहण म्हणतात.
ग्रहण काळातील खबरदारी
सामान्यतः ग्रहण काळात सुतक लागते. या काळात अनेक खबरदारी पाळावी लागते. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे नियमांचे पालन करण्याची गरज नाही. गर्भवती महिलांनाही काळजी करण्याची गरज नाही. मात्र ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे त्या ठिकाणी राहणारे भारतीय नियमांचे पालन करू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)