ठाणे : श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. शिवभक्तांसाठी शिवाची आराधना करण्याचा आजचा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण सोमवारी राज्यातील शिव मंदिरांमध्ये नाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. शिवभक्तांसाठी श्रावण सोमवार हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण असतो, त्यामुळे सर्व सिवभक्त आपल्या आराध्याचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक प्राचीन आणि ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात.
मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे अद्याप प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाही शिवभक्त त्यांच्या प्रिय आराध्य देवतेच्या दर्शनाला मुकणार आहे. राज्यातील भगवान शंकराची सर्व मुख्य मंदिरं सामान्यांसाठी दर्शनासाठी बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी शिवमंदिरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिरही यंदाच्या श्रावणात सलग दुसऱ्या वर्षी भाविकांसाठी बंदच राहणार यामुळे भाविकांचा सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड झाला आहे.
तरीही पहिल्या श्रावणी सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीपासून प्राचीन शिवमंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे भाविकांनी प्राचीन शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावरच हार फुलं वाहून भोलेनाथाला प्रार्थना केली. यंदा तरी हे कोरोनाचं संकट कमी होऊ दे आणि मंदिर मंदिराची दारं उघडू दे, असं साकडं यावेळी भाविकांनी भोलेनाथाला घातलं.
मंदिर भाविकांसाठी बंद असलं, तरीही जुन्या अंबरनाथ गावातील शिव मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी सकाळीच मंदिरात विधीवत पूजाअर्चना आणि अभिषेक केला. यानंतर मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आलं. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात दुकानांची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. लोकल सुद्धा 15 ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने मंदिरं उघडायला सुद्धा परवानगी द्यावी, अशी मागणी जुन्या अंबरनाथ गावातील मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी केली आहे.
अंबरनाथचं शिवमंदिर हे तब्बल 961 वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारल्याची नोंद आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचाही उत्कृष्ट नमुना मानलं जातं. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीतही अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या समावेश आहे. तर अतिशय जागृत देवस्थान अशी या मंदिराची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं इतिहासात पहिल्यांदाच हे मंदिर श्रावण महिन्यात बंद ठेवण्याची वेळ आली.
यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी मंदिरं उघडायला अजूनही शासनानं परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्राचीन शिवमंदिर भाविकांसाठी बंद ठेवले गेले आहे, अशी माहिती मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी दिली आहे.
Shravan Month 2021 | ‘देऊळ बंद’! श्रावण महिन्याला सुरुवात, सलग दुसऱ्या वर्षी शिव मंदिरं बंद असल्याने भाविक दर्शनाला मुकलेhttps://t.co/LpGxT9KY5M#ShravanMonth #ShravanSomwar2021 #ShivaTemple
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
संबंधित बातम्या :
Shravan Month 2021 | श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी, शिवामूठ वाहण्याची पद्धत काय? जाणून घ्या