मुंबई : नवरात्र (Navratri 2023) हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गादेवीचे भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि मनोभावे देवीची पूजा करतात. तसेच, या काळात भक्त देवीच्या मंदिरांनाही भेट देतात. या नवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील दुर्गा देवींच्या काही खास मंदिरांबद्दल सांगणार आहोत. या मंदिरांबद्दल भक्तांची विशेष श्रद्धा आहे. या मंदिरात दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊया या मंदिरांबद्दल.
वैष्णो देवी मंदिर- हे भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे, जिथे जगभरातून हिंदू भाविक येतात. जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. असे मानले जाते की देवी दुर्गा येथे खडकांच्या रूपात गुहेत निवास करते. हे मंदिर कटरा पासून 13 किलोमीटर वर आहे.
त्रिपुरा सुंदरी मंदिर, त्रिपुरा- हिंदू पौराणिक कथेनुसार सतीचा उजवा पाय ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील उदयपूर (पूर्वीचे रंगमती म्हणून ओळखले जाणारे) शहरात आहे. या मंदिरात काली मातेची सोरोशी रूपात पूजा केली जाते.
मंगळा गौरी मंदिर, गया (बिहार) – प्रचलित मान्यतेनुसार, देवी सतीचे स्तन आज जिथे मंदिर आहे तिथे पडले होते. हे मंदिर गया येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे आणि नवरात्रोत्सवादरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येते.
दंतेश्वरी मंदिर, छत्तीसगड- दंतेवाडाचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर छत्तीसगडच्या बस्तर भागात आहे. सुंदर खोऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप जुने आहे. असे मानले जाते की येथे सतीचा दात पडला होता, त्यामुळे या स्थानाचे नाव दंतेश्वरी पडले.
दुर्गा मंदिर, वाराणसी- हे मंदिर रामनगरमध्ये आहे. असे मानले जाते की हे मंदिर 18 व्या शतकात बंगाली राणीने बांधले होते. हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेतील उत्तर भारतीय शैलीतील नागरा शैलीत बांधले आहे. या मंदिरात चौकोनी आकाराचे तळे असून ते दुर्गा कुंड म्हणून ओळखले जाते. या इमारतीला गेरूच्या अर्काने लाल रंग दिला आहे. मंदिरातील देवीची वस्त्रेही गेरू रंगाची आहेत. एका मान्यतेनुसार, या मंदिरात स्थापित केलेली मूर्ती माणसाने बनवली नसून ही मूर्ती स्वतः प्रकट झाली होती, जी लोकांचे वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आली होती. नवरात्री आणि इतर सणांमध्ये हजारो भाविक या मंदिराला भक्तिभावाने भेट देतात.
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर- श्री महालक्ष्मी मंदिर हे विविध शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ते कोल्हापूर, महाराष्ट्र येथे आहे. येथे कोणताही भक्त आपल्या इच्छेने येतो, आईच्या आशीर्वादाने ती इच्छा पूर्ण होते. भगवान विष्णूची पत्नी असल्याने या मंदिराला माता महालक्ष्मी असे नाव पडले.
नैना देवी मंदिर, नैनिताल – नैनीतालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील किनारी नैना देवी मंदिर आहे. 1880 मध्ये भूस्खलनाने हे मंदिर उद्ध्वस्त झाले. नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. येथे सतीच्या शक्तीरूपाची पूजा केली जाते. मंदिरात दोन डोळे आहेत, जे नैना देवीचे प्रतिनिधित्व करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)