मुंबई : अग्नी हा पृथ्वीवर सूर्याचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्य हा जगाचा केंद्रबिंदू आणि विष्णूचे रूप आहे. त्यामुळे अग्नीसमोर सप्तपदी घेणे म्हणजे साक्षात देवासमोर सप्तपदी (Saptapadi Importance) घेणे होय. अग्नी हे एक माध्यम आहे ज्याद्वारे देवतांना यज्ञ अर्पण करून पुष्टी केली जाते. अशा प्रकारे सर्व देवतांना अग्नीच्या रूपात साक्षी मानून त्यांना पवित्र बंधनात बांधण्याचा विधी धर्मग्रंथात नमुद करण्यात आला आहे. वैदिक नियमानुसार अग्नीभोवती सात प्रदक्षिणा मारण्याचा नियम आहे. पहिल्या तीन प्रदक्षिणेमध्ये वधू पुढे चालते तर बाकीच्या प्रदक्षिणेत वर पुढे चालते. धार्मिक शास्त्रांत धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही चार रुपे शास्त्रात सांगितली आहेत. मात्र, कुठेही सप्तपदीचा उल्लेख आढळत नाही. विवाह करताना सप्तपदीची परंपरा प्रचलित झाली आहे. गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी वर-वधु एकमेकांना सात वचने देतात. वैदिक आणि पौराणिक शास्त्रात सप्तपदी तसेच सात अंकाला महत्त्व आहे.
लग्नाच्या वेळी वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये मंगळसूत्र घातल्याशिवाय विवाह सोहळा अपूर्ण मानला जातो. तिथे सप्तपदीपेक्षा मंगळसूत्राला अधिक महत्त्व आहे. मंगळसूत्रात काळे मणी आणि डोरले किंवा वाट्या असणे अनिवार्य मानले जाते. यामागे एक श्रद्धा आहे की मंगळसुत्राच्या वाट्या स्त्रीचे अशुभ शक्तीपासून रक्षण करते. तर काळे मणी भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
लग्नाच्या वेळी वराकडून वधूच्या भांगेत शेंदूर भरण्याच्या विधीला ‘सुमंगली’ म्हणतात. यानंतर पतीच्या दीर्घायुष्याची पत्नी कामना करते. विवाहित महिलेने भांगेत शेंदूर भरणे हे विवाहित असण्याचे प्रतीक आहे. शेंदूरमध्ये पारासारख्या धातूचे प्रमाण जास्त असल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. हे वाईट प्रभावापासून संरक्षण करते. अशुभ दोषांच्या निवारणासाठी शास्त्रात स्त्रियांना भांगेत शेंदूर भरण्याचा सल्ला दिला आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)