नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील आखाडा परिषदेचे अध्यक्ष पंचायती आणि आनंद आखाडयाचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज (Swami Sagaranand Saraswati Maharaj) यांचे आज निधन झाले आहे. आध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा पसरल्याची दुखद घटना समोर आली आहे. याबाबत सर्वच क्षेत्रातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहे. आज दुपारी ( शनिवारी दि. 8 ) वाजता संत, महंत आणि भाविकांच्या साक्षीने आनंद आखाडा गजलक्ष्मी मंदिर येथे समाधी दिली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची खडान खडा माहिती असलेले एक जाणकार संत परंपरेतील ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मा जुन्या पिढीतील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून सागरानंद सरस्वती स्वामीजींची ओळख होती. अनेक दशके त्र्यंबकेश्वरात ते वास्तव्यास होते.
सागरानंद सरस्वती स्वामीजींनी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिलं आहे.
अध्यात्म क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या स्वामीजींचे भारतभरात मोठा शिष्य परिवार असून त्यांच्या निधनाने भक्त परिवार पोरका झाला आहे.
त्र्यंबकेश्वर येथील सहा कुंभासह प्रयाग, हरिद्वार, ईलाहाबाद अशा एकूण 19 कुंभ मेळ्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
सिंहस्थ कुंभमेळ्यात शासकीय अधिकारी आणि साधू महंत यांच्या समन्वय घडवून आणण्यात स्वामींचा मोठा सहभाग असायचा.
हजारो भक्तांनी आणि प्रापंचिक साधकांनी त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली असून देशभरात त्यांचा भक्तपरिवार आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे ते गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आलेले असतांना 101 वर्ष वय झाले असून 2027 च्या कुंभाची तयारी सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली होती.
स्वामी हे आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक होते. लाखों रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केल्याचे त्यांचे शिष्य सांगतात.
त्यांच्या निधनाने त्यांचा भक्त परिवार आणि आध्यात्मिक क्षेत्रात पितृतुल्य व्यक्ती गमावल्याची भावना निर्माण झाली आहे.