मुंबई : हिंदू रितीरिवाजांमध्ये तुळशीविवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपात तुळशीचा विवाह (Tulsi Vivah 2023) लावण्याचा विधी आहे. या दिवशी जो कोणी शुभ मुहूर्तावर तुळशीमातेचा विवाह सोहळा करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, असे मानले जाते. सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानही मिळते. पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. या दिवशी मोठ्या थाटामाटात तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. यासोबतच विवाह इत्यादी शुभ कार्यांसाठीही शुभ मुहूर्त सुरू होतो. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी तुळशीविवाह कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे.
तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो, पण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथीला अनेक जण तुळशीमाता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधी करतात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने माणसाची प्रगती होते आणि भाग्याची साथही मिळते.
तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो. पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल. शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीचा विचार करून तुळशीविवाह 24 नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे. या शुभ संयोगात आपल्या घरात तुळशी-शाळीग्रामचे लग्न लावून दिल्याने घरात आर्थिक सुबत्ता येते आणि वैवाहिक जीवनातही सुख-समाधान येते.
सनातन धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशीमातेसोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह आयोजित केला जातो. या दिवशी विधीनुसार तुळशी-शाळीग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येते, असे मानले जाते. याशिवाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही तुळशीविवाह केला तर त्याला कन्यादान सारखेच फळ मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)