मुंबई : हिंदू धर्मात दररोज काही ना काही सण साजरा केला जातो. आज, मंगळवार, 26 सप्टेंबर, 2023, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या तिथीला वामन जयंती (Vaman Jayanti 2023) साजरी केली जात आहे. असे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेतला होता, जो श्री हरीच्या दशावतारांपैकी पाचवा होता. भगवान वामनाने प्रल्हादांचा नातू राजा बळी याचा तिन्ही जग तीन पावलांमध्ये मोजून त्याचा अहंकार मोडला होता. आज वामन एकादशीला कशा प्रकारे पूजा करावी आणि त्याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया.
वामन जयंतीला भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते. दक्षिणावर्ती शंखामध्ये गाईचे दूध मिसळून वामन देवाच्या मूर्तीला अभिषेक करावा. देवाला पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करा. भगवान विष्णूला दही आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजा केल्यानंतर कथा ऐका आणि नंतर आरती करा. शेवटी तांदूळ, दही आणि साखरेचे दान करून एखाद्या गरीब किंवा ब्राह्मणाला भोजन दान करा.
भगवान विष्णूंचा जन्म श्रवण नक्षत्रात वामन अवतारात झाला असल्याने या दिवशी श्रावण नक्षत्राचे विशेष महत्त्व आहे. श्रावण नक्षत्र 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11.55 ते 26 सप्टेंबर रोजी सकाळी 09.42 पर्यंत असेल. वामन जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 26 सप्टेंबर रोजी सकाळी 09.12 ते दुपारी 01.43 पर्यंत असेल.
पौराणिक कथेनुसार, अत्यंत शक्तिशाली राक्षस राजा बळीने भगवान इंद्राचा पराभव करून स्वर्ग काबीज केला होता. प्रल्हादचा नातू, भगवान विष्णूचा महान भक्त आणि दानशूर राजा असूनही, राजा बळी हा अहंकारी राक्षस होता. तो देव आणि ब्राह्मणांना घाबरवण्यासाठी आणि धमकवण्यासाठी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असे. अत्यंत पराक्रमी आणि अजिंक्य बाली आपल्या सामर्थ्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळाचा स्वामी झाला.
इंद्रदेवाच्या हातातून स्वर्ग निघून गेल्यावर ते सर्व देवांना सोबत घेऊन भगवान विष्णूंजवळ पोहोचले. इंद्रदेवांनी भगवान विष्णूला आपली आपबिती सांगितली आणि मदत मागितली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना या समस्येतून मुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर भगवान विष्णूंनी वामनाच्या रूपात पृथ्वीवर पाचवा अवतार घेतला.
भगवान वामन एका बटू ब्राह्मणाच्या वेषात बळी राजाकडे गेले आणि त्यांना त्यांच्या राहण्यासाठी तीन पावलांची जमीन देण्याची विनंती केली. बळी राजाने वामनाला तीन पाउलं जमिन देण्याचे मान्य केले. त्यानुसार त्याने ब्राम्हणाच्या रूपात असलेल्या भगवान विष्णूंना जमिन घेण्याची विनंती केली.
वामनदेवतेने आपल्या पहिल्या पायात संपूर्ण पृथ्वी काबिज केली. दुसऱ्या पाउलात देवलोक काबिज केले. तिसर्या पाउलासाठी जमीनच उरली नाही. पण राजा बळी आपल्या शब्दावर कायम होता, म्हणून तिसरे पाउलं त्याने आपले मस्तकावर ठेवावे अशी विनंती त्याने देवाला केली. राजा बळीच्या वचनबद्धतेवर वामन देव खूप प्रसन्न झाले. त्यामुळे वामन देव यांनी राजा बळीला पाताळात पाठवायचे ठरवले आणि बळीच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवले. यानंतर बळी राजा पाताळात गेला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)