पुणे : महाशिवरात्र (mahashivratri 2023) निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीगडाच्या (khandoba jejuri temple) मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी, भूलोकी, पाताळलोकी (त्रैलोक्य) या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज पहाटे पासून रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले . जेजुरीगडावर (pune jejuri) येळकोट येळकोट जयमल्हार,सदानंदाचा येळकोटचा ,हर हर महादेवाचा जयघोषाने वातावरण मल्हारमय झाल्याचं पाहायला मिळालं.
जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्व आहे. जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरा शेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळ घरात असणारे शिवलिंग पातालोकी शिवलिंग मानले जाते.
मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळ घरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.
कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाबा अमरनाथ मंदिर, शनी मंदिर येथील महादेव मंदिर, दुर्गेश्वर महादेव मंदिर तसेच परिसरातील महादेव मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या असून भक्तांकडून महादेवाची आराधना पूजन केले जात आहे याचबरोबर होळकर ग्रुप कडून बाबा अमरनाथ मंदिर जवळ, पंजाबी समाजाकडून गुरुद्वारा येथे पाचशे किलो साबुदाणा खिचडीचे व खजूरचे दिवसभर वाटप करण्यात आले.
परळी वैजनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या ज्योतिर्लिंग प्रभुवैद्यनाथाच्या महाशिवरात्री महोत्सवात मोठ्या उत्साहाने भाविक सहभागी झाले आहेत. महाशिवरात्रीच्या पर्वावर अनेक मान्यवर वैद्यनाथाचे दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे परळी नगर परिषदेच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटप उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात सहभागी होत आमदार धनंजय मुंडे यांनी भाविकांना खिचडी वाटपही केले.