हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत केले जाते (vat purnima 2022). हिंदू धर्मात या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात. मागच्या वर्षी कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे अनेकांना वट पूजा करण्यास मुकावे लागले, मात्र यंदा थोडी शिथिलता असल्याने स्त्रियांमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या 14 जूनला वट पौर्णिमा आहे. त्या निमित्याने बाजारपेठाही फुललेल्या दिसत आहेत. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा आहे.
वट पौर्णिमा १४ जून रोजी साजरी होणार असून ही पौर्णिमा सोमवार, १३ जून रोजी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुरू होईल आणि १४ जूनच्या संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील. या दरम्यान १४ जून रोजी सकाळी ११ ते १२.१५ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. वट पौर्णिमेच्या दिवशी साध्य योग आणि शुभ योगही तयार होत आहेत.
वटपौर्णिमा व्रत पाळणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर आंघोळ करून कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करावे. सावित्री, सत्यवान आणि यमाची मातीची मूर्ती वटवृक्षाखाली स्थापित करावी. या मुर्त्यांसह वडाची पूजा करावी. यानंतर झाडाभोवती कच्चे सूट गुंडाळून ३ परिक्रमा कराव्या.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)