मुंबई : भगवान शंकराचा प्रिय श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आज विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2023) व्रत आहे. चतुर्थी ही गणपतीला समर्पित असते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हणतात. म्हणूनच या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो. यंदाची विनायक चतुर्थी काही विशेष योग जुळून आल्यामुळे महत्त्वाची आहे.
सर्व देवतांमध्ये गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. गणेशपूजेशिवाय कोणतेही धार्मिक विधी पुर्ण होत नाही. विनायक चतुर्थीची महिमा शास्त्रात सांगितली आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने साधकाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व दुःखांचा अंत होतो.
1. सर्वार्थ सिद्धी योग – 21 ऑगस्ट रोजी सकाळी 05.53 ते 04.22 पर्यंत
2. रवि योग – 21 ऑगस्ट रोजी सकाळी 06.21 ते 04.22 पर्यंत
3. अमृत सिद्धी योग – 20 ऑगस्ट रोजी सकाळी 5.53 पासून दिवसभर राहील
4. साध्य योग – 19 ऑगस्ट रात्री 09.19 ते 20 ऑगस्ट रात्री 09.58 वा.
5. शुभ योग – 20 ऑगस्ट 2023, सकाळी 09.58 ते 21 ऑगस्ट रात्री 10.20 वा.
विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करावे. यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करून तांब्याच्या पात्राने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. गणपतीच्या मंदिरात गुळ खोबरं किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. त्यांना गुलाबाचे लाल फूल आणि दूर्वा अर्पण करा आणि ओम गम गणपतये नमः मंत्राचा 27 वेळा जप करा. गणपती अथर्वशीर्ष पठण करा.
त्यानंतर दुपारी गणेशपूजेच्या वेळी आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे किंवा मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. संकल्प करून श्री गणेशाची आरती करून मोदक अर्पण करून प्रसाद म्हणून वाटप करावे. असे केल्याने गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)