आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा व अमावस्या तिथीला खूप महत्वाचे मानले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या महत्वाची असते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या तसेच या वर्षाची शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे. यावर्षी पौष महिन्यातील अमावस्या सोमवारी येत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. दरम्यान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पितरांना स्नान व पिंडदान करण्याला विशेष महत्व आहे. स्नान, दान आणि पितरांची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. हिंदू धर्मातील सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी आणि सोमवती अमावस्या सर्वात महत्वाची मानली जाते. या दिवशी देवाची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात या अमावास्येची तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व.
२०२४ या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या तिथी सोमवार ३० डिसेंबरला आहे. ही तिसरी सोमवती अमावस्या 30 डिसेंबर रोजी पहाटे 04 वाजून 01 मिनिटांनी प्रारंभ होते आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 03 वाजून 56 मिनिटांनी संपन्न होते.
पौष महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाचा ब्रह्म मुहूर्त सकाळी ५.२४ ते ६.१९ या वेळेत सुरू होईल. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १२.०३ ते १२.४५ या वेळेत असेल. वृद्धी योग सकाळपासून रात्री ८.३२ वाजेपर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्नान आणि दान करू शकता. या दिवशी गंगेत स्नान केल्याने त्याचबरोअबर दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते
वर्षातील शेवटची अमावस्या सोमवारी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण हा दिवस भगवान महादेवाला समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पितरांचे तर्पण व श्राद्ध देखील केले जाते. अशाने व्यक्तीला पितरांचा आशीर्वाद मिळतो
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)