मुंबई : भगवान शिव शंकर यांना भोलेनाथ म्हंटलं जातं. कारण शिव शंकर भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. भक्तांच्या इच्छा ते लवकर पूर्ण करतात अशी धारणा आहे. त्यामुळे भक्तगण त्यांची पूजा विधी करण्याची एकही संधी सोडत नाही. भगवान शिवांचा आशीर्वाद असला की दु:खाची तीव्रता कमी होते. तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. हिंदू शास्त्रानुसार, कोणताही भाविक शिवाची कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष असताना पूजा विधी करतो तेव्हा त्याला लवकर फलप्राप्ती होते. जीवनातील अनेक समस्यांचं सहज समाधान होतं. त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी शिवभक्त न चुकता शिवाची पूजा करतात. प्रदोष व्रत शनिवारी आला तर शनिपीडेतून सुटका मिळवण्याची संधी असते. शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनिप्रदोष असं संबोधलं जातं. चला जाणून घेऊयात या व्रताचं महत्त्व आणि पूजाविधी
हिंदू पंचांगानुसार, शनि प्रदोष व्रत 1 जुलै 2023 रोजी आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला शनिवार येत असल्याने शनि प्रदोष आहे. ही तिथी 1 जुलै 2023 रोजी मध्यरात्री 1 वाजून 16 मिनिटांपासून रात्री 11 वाजून 7 मिनिटापर्यंत असेल. या दिवशी भगवान शिव शंभूंची पूजा केल्याल शनि पीडेतून दिलासा मिळतो. भगवान शिवांच्या पुजेसाठी उत्तम कालावधी संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत असेल.
शनि प्रदोषाच्या दिवशी जातकाने सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि पूजा करावी. त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा स्नान करून मंदिरात जावं. शिवलिंगावर गंगाजल, फुलं, फळं, दीप, धूप, बेलपत्र, शमीपत्र, भस्म, चंदन अर्पण करावं. यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी. महादेवाची आरती करून आपल्या इच्छित मनोकामनेसाठी प्रार्थना करावी.
तुमच्या कुंडलीत शनि दोष असेल तर या दिवशी पूजा करून दिलासा मिळवू शकता. या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि शमीपत्र अर्पण करा. त्यानंतर एक माळ महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. भगवान शिवाची पूजा केल्याने शनि पीडितून दिलासा मिळतो अशी मान्यता आहे. भक्तांना सुख, सौभाग्य, संपत्तीची प्राप्ती होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)