सध्या पितृ पक्ष (Pitru Paksha 2022) चालू आहे. पितरांची पूजा आणि तर्पण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो, ज्यामध्ये श्राद्ध (Shradha Karma) केल्यावर पूर्वज प्रसन्न होऊन त्याच्या कुटुंबाला दीर्घायु, संपत्ती, शिक्षण, संतती, स्वर्ग, मोक्ष आणि इतर सर्व प्रकारचे ऐहिक आशीर्वाद देतात. श्राद्धचंद्रिका ग्रंथानुसार श्राद्धापेक्षा दुसरे कोणतेही पुण्याचे कार्य नाही असे सांगितले आहे, त्यामुळे सुज्ञ व्यक्तीने आपल्या पितरांचे श्राद्ध केलेच पाहिजे, पण श्राद्धाच्या संदर्भातही एक प्रश्न उपस्थित होतो की पितरांचे श्राद्ध नेमके कोणी करायचे? याचा अधिकार कोणाला आहे? श्राद्धात किती ब्राह्मणांना भोजनाला बोलवावे? याबद्दल शास्त्रात दिलेली माहिती आपण जाणून घेऊया.
पितरांच्या श्राद्धाचा अधिकार प्रत्येकालाच नसतो. गरुड, कूर्म आणि मत्स्य यांसारख्या पुराणानुसार वडिलांच्या श्राद्धाचा पहिला अधिकारी हा त्याचा मुलाला आहे. मुलगा नसेल तर पत्नी आणि पत्नीच्या अनुपस्थितीतही भावंडांनी श्राद्ध करावे. तेही नसेल तर सपिंडांना म्हणजेच एकाच कुळातील व्यक्तीला श्राद्ध करण्यास पात्र मानले जाते.
जावई आणि सून देखील श्राद्ध करू शकतात, परंतु जर यापैकी कोणीही नसेल तर इतर कुठलेही नातेवाईक मृत व्यक्तीच्या पैशाने श्राद्ध करू शकतात. या शिवाय दत्तक पुत्र देखील श्राद्धास पात्र आहेत.
श्राद्ध कर्मात भोजनासाठी किती ब्राम्हणांना बोलवावे. शास्त्रानुसार श्राद्धासाठी अधिक ब्राह्मणांना भोजनास बोलावू नये. देवांच्या कार्यासाठी दोन ब्राह्मण आणि पितरांच्या कार्यासाठी तीन ब्राह्मण पुरेसे आहेत.
यामागचे कारण म्हणजे सध्या विभक्त कुटुंब जास्त आहेत. त्यामुळे मनुष्यबळ देखील कमी आहे. अशा स्थितीत अधिक ब्राह्मणांना भोजनास बोलाविल्यास त्यांच्या आदर आथित्यात दुर्लक्ष होऊ शकते. दोनच ब्राम्हणांना जेवू घालावे जेणेकरून त्यांना तृप्त करता येईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)