Tirupati Balaji : तिरूपती बालाजीला का दिले जाते केसांचे दान? या केसांचे पुढे काय होते?

| Updated on: Jun 22, 2023 | 4:18 PM

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपतीजवळ तिरुमाला टेकडीवर स्थित आहे, जिथे भगवान श्री हरी विष्णू वेंकटेश्वर म्हणून पूजले जातात. भगवान श्री व्यंकटेश्वर तिरुमला येथे त्यांची पत्नी पद्मावती सोबत राहतात.

Tirupati Balaji : तिरूपती बालाजीला का दिले जाते केसांचे दान? या केसांचे पुढे काय होते?
तिरूपती बालाजी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : श्रीमंत देव म्हणून कोण आहे असे जर एखाद्याला विचारले तर  तिरूपती बालाजी (Tirupati Balaji) यांचे नाव आपसुकच घेतल्या जाते. बालाजी हे फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. जगभरातून भाविक त्यांच्या दर्शनाला तिरूपती येथे येत असतात. याशिवाय हे देवस्थान अत्यंत श्रीमंत देवथ्यानाच्या यादीतही समाविष्ट आहे. जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपतीजवळ तिरुमाला टेकडीवर स्थित आहे, जिथे भगवान श्री हरी विष्णू वेंकटेश्वर म्हणून पूजले जातात. भगवान श्री व्यंकटेश्वर तिरुमला येथे त्यांची पत्नी पद्मावती सोबत राहतात. या मंदिरात आणखी एक प्रथा अनेक भावीकांकडून पाळली जाते, ती म्हणजे मंदिर परिसरात डोक्यावरचे केस दान केले जातात. (Hair donation at Tirupati) जाणून घेऊया ही प्रथा कशी पडली.

अशी आहे पौराणिक कथा

तिरुपतीमध्ये केस दान करण्यामागे एक पौराणिक कारण आहे. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी भगवान बालाजीच्या मूर्तीवर मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता. रोज एक गाय त्या डोंगरावर यायची आणि दूध देऊन निघून जायची. गाईच्या मालकाला हा प्रकार कळताच त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली.

या हल्ल्यात बालाजीच्या डोक्यालाही दुखापत झाली, तसेच त्यांच्या डोक्याचे केसही गळून पडले. त्यानंतर भगवान बालाजीची आई नीला देवी यांनी आपले केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. यामुळे परमेश्वराच्या डोक्यावरील जखम पूर्णपणे बरी झाली. प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला सांगितले की केसांमुळे शरीराचे सौंदर्य वाढते आणि तू ते माझ्यासाठी अर्पण केले आहेस. आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तेव्हापासून भाविक बालाजी मंदिरात केस दान करत आहेत. या मंदिराजवळ नीलाद्री हिल्स आहे, ज्यावर नीला देवीचे मंदिर आहे.

हे सुद्धा वाचा

दान केलेल्या केसांचे पुढे काय होते?

तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षी लाखो किलो केस दान केले जातात. जगभरातील भाविकांकडून दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन मानवी केस तिरुपती मंदिराला दान केले जातात. दैनंदिन प्रक्रियेनुसार, आणि ते व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, कापलेले केस उकळून, धुऊन, वाळवले जातात आणि योग्य तापमानात साठवले जातात. त्यानंतर ते वेबसाइटवर श्रेणीनुसार विकले जातात. केसांचा ऑनलाइन लिलाव तिरुमला तिरुपती देवस्थान आयोजित करते. दान केलेल्या केसांचा ई-लिलावातून मंदिराला कोट्यावधींचा निधी मिळतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केसांना मोठी मागणी

तिरुपती बालाजी मंदिरात दान केलेले केस आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. त्यांचा वापर हेअर विग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. युरोप, अमेरिका, चीन, आफ्रिका आणि इतरत्र बाजारपेठांमध्ये या केसांना प्रचंड मागणी आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)