मुंबई : आपल्या देशात हवनाची म्हणजेच यज्ञाची परंपरा फार जुनी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ प्रसंगी हवन (Hawan Rituals) करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवंताचे स्मरण केले पाहिजे, तरच कार्य सफल होते. हवन करताना मंत्रानंतर स्वाहा हा शब्द निश्चितपणे उच्चारला जातो, त्यानंतरच आहूती दिली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक आहूतीच्या वेळी स्वाहा हा शब्द का उच्चारला जातो आणि तो उच्चारणे का महत्त्वाचे आहे? या मागची कथा काय आहे? जर तुम्हाला माहित नसेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
जेव्हा जेव्हा हवन केले जाते तेव्हा हवन कुंडात स्वाहा म्हणत हवन साहित्य टाकले जाते. स्वाहाचा अर्थ योग्य रीतीने वितरण करणे असा आहे. देवांची आहूती स्वीकारल्याशिवाय कोणताही यज्ञ यशस्वी मानता येत नाही, असे मानले जाते. अग्नीने स्वाहा केले तरच देव अशी आहूती स्वीकारतात.
हवनाच्या वेळी स्वाहा असे उच्चारण्याबाबत अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत, त्यापैकी काही येथे नमूद करत आहोत. पहिल्या कथेनुसार स्वाहा ही राजा दक्षची कन्या होती, जिचा अग्निदेवाशी विवाह झाला होता. म्हणूनच जेव्हा कोणी अग्नीला काही अर्पण करतो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे स्मरण होते, तेव्हाच अग्निदेव त्या वस्तूचा स्वीकार करतात.
दुसऱ्या कथेनुसार, एकदा देवांना दुष्काळ पडला. त्यांच्याकडे अन्नपदार्थांचा तुटवडा जाणवू लागला. ही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने एक उपाय शोधून काढला की अन्नपदार्थ पृथ्वीवरील ब्राह्मणांनी देवतांपर्यंत पोहोचवावे. त्यासाठी त्यांनी अग्निदेवाची निवड केली. त्या वेळी अग्निदेवाला दहन करण्याची क्षमता नव्हती, म्हणून स्वाहा जन्माला आला. स्वाहाला अग्निदेवाकडे राहण्याचा आदेश दिला. यानंतर, जेव्हा जेव्हा अग्निदेवाला काहीही अर्पण केले जात असे तेव्हा स्वाहा ते जाळून देवांना अर्पण करायचे. तेव्हापासून आजपर्यंत स्वाहा सदैव अग्निदेवांच्या सोबत राहतो.
तिसर्या कथेनुसार, स्वाहा ही निसर्गाची कला म्हणून जन्माला आली. भगवान श्रीकृष्णाने स्वाहाला आशीर्वाद दिला होता की स्वाहाला समर्पित केल्याशिवाय देवतांसाठी अभिप्रेत असलेली कोणतीही सामग्री देवतांपर्यंत पोहोचणार नाही. यामुळेच हवनाच्या वेळी निश्चितपणे स्वाहा पठण केले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार हवन देवतेने स्वीकारल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होत नाही. अग्नीत आहूती देताना स्वाहा म्हटल्यावरच देव हवन साहित्य स्वीकारतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)