मुंबई : गृहप्रवेश असो किंवा नवीन कार खरेदी, या सर्व शुभ प्रसंगी नारळ फोडण्याची परंपरा (Nariyal in Puja) आहे, धार्मिक मान्यतेनुसार यामुळे नकारात्मक उर्जा दूर होते. तसेच तुमच्या आनंदाला कोणाची नजर लागत नाही. हवन पूजेच्या वेळी कलशात नारळ ठेवले जाते. हिंदू धर्मात नारळाचा वापर कोणत्याही पूजा किंवा शुभ कार्यात अवश्य केला जातो. नारळ फोडण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे अशीच सुरू आहे, मात्र एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल ती म्हणजे महिला सहसा नारळ फोडत नाही. यामागे नेमके काय कारण आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या सर्व गोष्टींमागे वेगवेगळ्या कथा प्रचलीत आहेत, चला कारण जाणून घेऊया.
नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. पूजेत नारळ ठेवणे पवित्र मानले जाते, धार्मिक मान्यतेनुसार नारळाची उत्पत्ती भगवान विष्णूने केली होती, म्हणून त्याला श्रीफळ असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव वास करतात असे म्हणतात. या कारणास्तव, प्रत्येक पूजेमध्ये नारळ अनिवार्य असते. पुजेत नारळ ज्याला आपण श्रीफळ देखील म्हणतो ते देवाला अर्पण केले जाते. तसेच ते फोडल्यावर सर्वांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते.
आता प्रश्न येतो की महिला नारळ न फोडण्याचे कारण काय? यामागे लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार, काही लोकांचा असा विश्वास आहे की नारळ हे एक बीज आहे, ज्यापासून जीवन निर्माण होते आणि स्त्रिया देखील जीवनदाता आहेत, म्हणून ते बीज नष्ट करू शकत नाहीत. याशीवाय नारळ फोडण्यासाठी जास्त शक्तीची गरज असते स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये शारिरीक शक्ती जास्त असते, त्यामुळे स्त्रीयांऐवजी पुरूषांना नारळ फोडण्याचे काम सोपवले जाते. या शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे शुभ प्रसंगी स्त्रीया बांगड्या घालतात. नारळ फोडताना त्या बांगड्या फुटू शकतात, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. यासाठी स्त्रीयांनी नारळ न फोडण्याचा सल्ला जुन्याकाळी दिला जात असे. तसे यामागे कुठली अंधश्रद्धा नाही. महिलांनी नारल न फोडण्याचा कुठलाही नियम सांगण्यात आलेला नाही. नारळ फोडण्यासाठी एखादी महिला शारिरीक दृष्ट्या सक्षम असेल तर त्यांनी ते अवश्य फोडावे. तसे, महिलांना कोठेही नारळ फोडण्यास मनाई नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)