मुंबई : अयोध्येत प्रभू रामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे. गाभाऱ्यात प्रभू रामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित केली गेली आहे. आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली जाईल आणि मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. प्राणप्रतिष्ठपनेसाठी गेल्या काही दिवसांपासून विधीवत पूजा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकल्प सोडला असून त्यांच्या उपस्थितीत प्रभू रामाचं दर्शन होणार आहे. 22 जानेवारीनंतर भक्तांना खरी ओढ लागणार आहे ती दर्शनाची..यासाठी भाविकांनी आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे. पण तुम्हालाही दर्शनाला जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तिथे गेल्यावर तुमच्या पदरी निराशा पडायला नको. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय दर्शनाला गेलं तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे दर्शनाची वेळ, आरती, श्रृंगाराबाबत जाणून घ्या. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजून घ्या.
प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केलं नाही तर मंदिराजवळील काउंटरवर सरकार मान्यताप्राप्त ओळखत्र दाखवून तिकिट घेऊ शकता.
अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन सकाळी 6 ते सकाळी 11.30 पर्यंत असेल. त्यानंतर दुपारी 2 नंतर रात्री 7 वाजेपर्यंत दर्शन करता येईल. प्रभू रामांची पाच वेळा आरती होईल. पण भाविकांना तीन आरती घेता येतील. यात पहिली श्रृंगार आरती 6.30, त्यानंतर मध्यान्ह आरती दुपारी 12 वाजता आणि संध्याआरती 7.30 वाजता असेल.