मेलबर्न: तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीतजसप्रीत बुमराहच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. एकट्या बुमराहने तब्बल 6 फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला तब्बल 292 धावांची आघाडी मिळाली. बुमराने 15.5 षटकात अवघ्या 33 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. बुमराच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अक्षरश: दाणादाण उडाली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 443 धावांवर पहिला डाव घोषित केला होता.
त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांत आटोपला. भारताच्या 443 धावांचा पाठलाग करताना, चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची 7 बाद 145 अशी दयनीय अवस्था झाली. त्यानंतर लगेचच बुमराने ऑस्ट्रेलियाला आणखी एक दणका दिल्याने कांगारुंचे 8 फलंदाज तंबूत परतले. मग ऑस्ट्रेलियाचं शेपूट गुंडाळायला बुमराहला जास्त वेळ लागला नाही. तळाचे फलंदाज नॅथन लायन आणि जोस हेजलवूड यांना शून्यावर तंबूत धाडून बुमराहने ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. कसोटीचा आज तिसरा दिवस आहे.
बुमराहच्या कौतुकासाठी सेहवागची आठवले स्टाईल कविता
भारताच्या जसप्रीत बुमराने 6 तर रवींद्र जाडेजाने 2 विकेट घेत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कापून काढली. मोहम्मद शमी आणि इशांत शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाने कालच्या बिनबाद 8 धावांवरुन आज खेळाला सुरुवात केली. संघाची धावसंख्या 24 झाली असताना इशांत शर्माने अरॉन फिंचला मयांक अग्रवालकरवी झेलबाद करुन भारताला पहिलं यश मिळवून दिलं. फिंचने 8 धावा केल्या.
यानंतर 22 धावा करणारा सलामीवीर हॅरिसला बुमराने बाद करुन ऑस्ट्रेलियाला दुसरा दणका दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी संयमी फलंदाजी केली. मात्र अष्टपैलू रवींद्र जाडेजाने ख्वाजाचा काटा काढला. त्याने 21 धावा केल्या. तर बुमराने मार्शला 19 धावांवर पायचीत केलं.
रोहितचं शतक जवळ आलं आणि विराटने डाव घोषित केला, चाहते चिडले
मग बुमरानेच टीम हेडच्या त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 92 अशी केली. त्यानंतर पुन्हा रवींद्र जाडजाने आक्रमक पवित्रा घेत मिचेल मार्शला तंबूत पाठवलं. तर पॅट कमिन्सची विकेट मोहम्मद शमीने घेतली. कमिन्सने 17 धावा केल्या. मग बुमराने ऑस्ट्रेलियाची शेपूट गुंडाळली.
Tea time here at the MCG on Day 3 as Australia move to 145/7. Australia trail by 298 runs. Join us for the final session of play in a bit #AUSvIND pic.twitter.com/VuZjKeoUon
— BCCI (@BCCI) December 28, 2018
दुसऱ्या दिवसाचा खेळ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 अशी मजल मारली. त्याआधी भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. यानंतर दिवसातील 9 षटकांसाठी ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना मैदानात उतरावं लागलं. मात्र भारतीय गोलंदाजांना इतक्या कमी काळात विकेट घेण्यात अपयश आलं. दरम्यान भारताकडूनचेतेश्वर पुजारा 106, विराट कोहली 82, मयांक अग्रवाल 76 धावा आणि रोहित शर्माने नाबाद 63 धावा केल्या. हिटमॅन रोहित शर्माने अर्धशतकानंतर वेगवान फलंदाजीला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडत गेल्या. ऋषभ पंत 39 आणि रवींद्र जाडेजा 4 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव 7 बाद 449 धावांवर घोषित केला. रोहित शर्माने 114 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या.
संबंधित बातम्या