मुंबई : 16 व्या मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे दिमाखात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये 46 हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. परदेशी नागरिकही यामध्ये सहभागी झाले आहेत. एकूण सात प्रकारात ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. विशेष म्हणजे पहाटे 5.30 वाजता फुल मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ ऑलिम्पिक बॉक्सर मेरी कोमच्या हस्ते करण्यात आले. तसेच अनिल अंबानी यांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शवला.
दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर सहभागी होतात. पहाटे फुल मॅरेथॉनला सुरुवात झाली असून हाफ मॅरेथॉनलाही सुरुवात झाली आहे. हाफ मॅरेथॉनची सुरुवात वरळी सिलींकवरुन आमदार सुनिल शिंदेच्या हस्ते करण्यात आली. यावेळी धावपटूंमध्ये उत्साह वाढवण्यासाठी मरिन ड्राईव्हवर ढोल पथकही लावण्यात आले आहेत.
हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांकावर श्रीणू मुगाता, द्वितीय क्रमांकावर करण थापा तर तिसऱ्या क्रमांकावर कालिदास हिरवे, तर महिला गटात प्रथम क्रमाकांवर मिनू प्रजापत (राजस्थान पोलीस), दुसऱ्या क्रमांकावर साई गिता नाईक (मुंबई पोलीस) आणि तिसऱ्या क्रमांकावर मंजू यादव (रेल्वे) विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये अपंग जयश्री शिंदे यांनीही दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. त्या स्वत: पायाने आधु आहेत. मात्र गेले काही वर्ष त्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. प्रत्येक मुंबईकरांने धावलं पाहिजे असा संदेश त्या या मॅरेथॉनमधून देत आहेत.
या मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी ऑलिम्पिक बॉक्सर मेरी कोम, अभिनेता गुलशन ग्रोव्हर, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाईसह अनेक दिग्दजांनी हजेरी लावली आहे.