लंडन : यंदाच्या विश्वचषकात स्टम्प बेल्सचा वाद सुरु आहे. बॉल स्टम्पला लागतो पण, स्टम्पवरील बेल्स न पडल्यानं तो बाद ठरवला जात नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. त्यातच स्टम्पवरील बेल्स पडत नसल्यामुळे फलंदाजांना जीवदान मिळतं आहे. यामुळे पुन्हा एकदा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत स्टम्प बेल्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. स्पर्धेत बेल्स का पडत नाही याचीच चर्चा जास्त रंगली आहे. असं असलं तरी आयसीसीने मात्र याच बेल्स कायम राहतील असं म्हटलं आहे.
यंदाच्या स्पर्धेत पाच वेळेस बेल्स न पडल्यानं फलंदाजांना जीवदान मिळालं. रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातही हे चित्र पाहायला मिळालं. बुमराहच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर ऑऊट झाला होता. मात्र स्टम्पवरील बेल्स न पडल्याने वॉर्नरला जीवदान मिळालं. यानंतर बेल्सवर बोट ठेवत बेल्सविरोधात जोरादार चर्चा सुरु झाल्या..
बेल्सने जीवनदान दिलेले फलंदाज – दक्षिण आफ्रिका VS इंग्लंड
आदिल रशीदच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉक फक्त बाद होण्यापासून वाचला नाही तर त्याला रिव्हर्स स्वीप मारल्यामुळे चार धावा मिळाल्या. डी कॉकच्या बॅटला चेंडू लागून स्टम्पच्या कडेला लागला आणि चेंडू सीमारेषेच्या पलिकडे गेला. मात्र, बेल्स न पडल्यामुळे डी कॉकला बाद देण्यात आले नाही.
बेल्सने जीवनदान दिलेले फलंदाज – न्यूझीलंड VS श्रीलंका
बोल्टच्या गोलंदाजीचा सामना करुणारत्नेने केला. चेंडू स्टम्पला लागून गेला. मात्र, बेल्स न पडल्यामुळे करुणारत्नेला जीवनदान मिळाले.
बेल्सने जीवनदान दिलेले फलंदाज – वेस्ट इंडिज VS ऑस्ट्रेलिया
मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गेलला झेलबाद देण्यात आले. मात्र, गेलने चेंडू बॅटला न लागल्याचा सांगत रिव्ह्यू मागितला. रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला न लागता थेट स्टम्पला लागल्याचे दिसून आले. मात्र, बेल्स न पडल्यामुळे गेलला नाबाद देण्यात आले.
बेल्सने जीवनदान दिलेले फलंदाज – इंग्लंड VS बांगलादेश
बेन स्टोकच्या चेंडूवर मोहम्मद सैफुद्दीनसोबतही हा किस्सा झाला. चेंडू स्टम्पला लागला. मात्र, बेल्स पडल्या नाहीत.
बेल्सने जीवनदान दिलेले फलंदाज – भारत VS ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करत असताना जसप्रीत बुमराहचा चेंडू स्टम्पवर लागला. मात्र, बेल्स पडल्या नसल्यामुळे वॉर्नरला बाद ठरवता आलं नाही.
मागील काही महत्त्वाच्या स्पर्धांपासून ICCनं पारंपरिक लाकडी बेल्सऐवजी प्लास्टीकच्या बेल्स वापरण्यास सुरुवात केली. या बेल्सला जिंग बेल्स नाव देण्यात आलं आहे.
जिंग बेल्सचं वैशिष्ट्य
– वजनाने लाकडी बेल्सपेक्षा हलक्या
– बेल्स हलल्या तरं त्यातील लाइट पेटते
– यामुळे फलंदाज बाद झाला की, नाही समजण्यास सोपे
– चेंडू स्टम्पवर लागल्यावर बेल्समधील लाइट पेटते
ICCच्या नियमानुसार, बेल्स खाली पडल्यानंतर फलंदाजाला बाद देता येते. मात्र जिंग बेल्स पडत नसल्यामुळे त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. जिंग बेल्सचे वजन लाकडी बेल्सपेक्षा हलक्या असल्यामुळे पडत नाहीत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.