India A Tour of West Indies A : भारतीय अ संघाने वेस्ट इंडिज अ संघावर 8 विकेट्सने विजय मिळवत 4-1 ने मालिका (unofficial ODI) खिशात घातली. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय अ संघाने (India A) आठ विकेट्स राखून विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी केवळ 33 षटकातच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
केवळ एका धावेने ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं. 11 चौकार आणि 3 षटकारांसह 89 चेंडूत त्याने 99 धावा केल्या. तर दुसरीकडे शुबमन गिलने 40 चेंडूतच 69 धावा केल्या. श्रेयस अय्यरने नाबाद 61 धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या सर्व मालिकेत ऋतुराज गायकवाडने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मूळचा पुण्याचा असलेला ऋतुराज सध्या कमालीचा फॉर्मात आहे.
महाराष्ट्रातील सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज सलामीवीरांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानंतर युवा खेळाडू पृथ्वी शॉनेही कसोटी मालिकेत पदार्पणातच शतक ठोकून सलामीवीर म्हणून त्याचं स्थान पक्क केलं. पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. आता महाराष्ट्रातील आणखी एक सलामीवीर फलंदाज तुफान फॉर्मात आहे.
ऋतुराजने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडिज अ विरुद्ध जून 2019 पासून अर्धशतकाच्या आतील खेळी अपवादानेच केली आहे. जूनपासून आजपर्यंत खेळलेल्या आठ डावांमध्ये त्याच्या नावावर दोन शतकं, ज्यामध्ये 187 या सर्वोच्च धावसंख्येचाही समावेश आहे. तर चार अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज अ विरुद्ध त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं. आठ डावांमध्ये त्याने 116 च्या स्ट्राईक रेटने आणि 112.83 च्या सरासरीने 677 धावा केल्या आहेत. त्याच्या सलग आठ खेळींमध्ये 187* (136), 125* (94), 84 (59), 74 (73), 3 (10), 85 (102), 20 (17) आणि 99 (89) धावांचा समावेश आहे.