टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!

| Updated on: Jan 21, 2021 | 11:13 AM

टीम इंडियाचा विजयीवीर अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत 2-1 ने पराभव केला.

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे पवार ब्रँड!
शरद पवार, अजिंक्य रहाणे
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा विजयीवीर अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत 2-1 ने पराभव करुन, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या जबरदस्त कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेचं मुंबई नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं. (Ajinkya Rahane led Team India Flight lands in Mumbai after Sharad Pawar mediates)

अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी अजिंक्यची सोसायटीच नव्हे तर संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब बनलं होतं. आपल्या कुटुंबातील विजयीवीर परततोय, त्याच आवेशात त्याचं स्वागत करण्यात आलं.  यावेळी अजिंक्य रहाणेची चिमुकली लेक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. बापाला पाहून चिमुकल्या अजिंक्य रहाणेला बिलगली.

शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर विमान मुंबईत उतरलं

दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारन्टाईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान उतरण्याची परवानगी आधी मिळाली नव्हती. पवारांनी सूत्रं हलवल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. अन्यथा टीम इंडियाचं विमान थेट चेन्नईत उतरलं असतं.

क्वारंटाईनची बाऊण्ड्री नाही

दरम्यान, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम मुंबईत आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना कडक निर्बंध घालून सक्तीने  सात ते 14 दिवस क्वारंटाईन केलं जातं. मात्र तब्बल 5 महिन्यांनी मुंबईत परतणाऱ्या आणि जगात भारताचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या टीम इंडियाच्या या योध्यांसाठी क्वारंटाईनची बाऊण्ड्री लावण्यात आली नाही. विमानतळावर केवळ RTPCR Test करुन भारतीय खेळाडूंना घरी सोडण्यात आलं.

कोचसह चौघे मुंबईत दाखल

दरम्यान, जगात विजयाचा डंका वाजवून मायभूमीत परणाऱ्या महाराष्ट्रीय खेळाडूंनाही मुंबईत सन्मान मिळाला. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि पालघरचा शार्दूल ठाकूर हे मुंबईत दाखल झाले. या सर्वांचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं.

अजिंक्यच्या गावातही जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या गावात जल्लोष साजरा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

Watch VIDEO : अजिंक्य रहाणेचं घरी जंगी स्वागत

संबंधित बातम्या :

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

“आमच्या अजिंक्यला कर्णधार करा”, रहाणेच्या कुटुंबात जल्लोष, नातवाच्या कामगिरीने आजी भारावली

(Ajinkya Rahane led Team India Flight lands in Mumbai after Sharad Pawar mediates)