ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

| Updated on: Jan 19, 2021 | 2:49 PM

ग्रामपंचायत निवडणुकीतील गुलाल खाली बसण्यापूर्वीच, अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्त्वात टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्येही गुलाल उधळला.

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!
Ajinkya Rahane_ Team India_ Chandanapur Gram Panchayat
Follow us on

ब्रिस्बेन : भारताने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा (India beat Australia) धुव्वा उडवला. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीम इंडियाने (Team India win) 3 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली. टीम इंडियाने पाचव्या दिवशी 3 विकेट्स राखून बाजी मारली आणि कांगारुंची घमेंड उतरवली. वर्णद्वेषी टिपण्या ते प्रेक्षकांकडून शिव्यांच्या लाखोल्या, अशा अनेक प्रसंगांना तोंड दिलेल्या टीम इंडियाने, केवळ कसोटी सामनाच जिंकला असं नाही, तर कांगारुंच्या नाकावर टिच्चून चार सामन्यांची मालिकाही 2-1 अशी खिशात टाकली. (Ajinkya Rahane team india beat Australia also Rahane panel wins Chandanapuri Gram Panchayat election)

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीतील (Maharashtra Gram panchayat result) गुलाल खाली बसण्यापूर्वीच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्येही गुलाल उधळला. महाराष्ट्रात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम असताना, तिकडे महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचं खंबीर नेतृत्त्व करत होता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा आली. रहाणेनेही आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीत लोळवलं, तिसरी कसोटी ड्रॉ झाली आणि चौथ्या कसोटीतही धडाकेबाज विजय मिळवून देऊन, मालिका जिंकली.

चंदनापुरीतही रहाणेंचं वर्चस्व

अजिंक्य रहाणे हा मूळचा अहमदनगर (ajinkya rahane village) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातला आहे. चंदनापुरी (ajinkya rahane village Chandnapuri) हे त्याचं गाव. राज्यातील जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींचा निकाल काल जाहीर झाला. चंदनापुरीतही रहाणेंच्या पॅनेलने विजय मिळवला. चंदनापुरी ही 13 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या गावात रहाणे आडनावाचे बहुसंख्य आहेत. गावच्या या निवडणुकीत अजिंक्य रहाणेच्या घरातील किंवा नातेवाईक कोणीही उमेदवार नव्हतं. पण अजिंक्य रहाणेच्या या गावातील निवडणुकीकडे पंचक्रोशीचं लक्ष होतं.

या निवडणुकीत रामनाथ रहाणे अर्थात आर बी शेठ रहाणे यांच्या शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली. 13 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवून, सत्ता काबीज केली. त्यांच्या विरोधातील ग्रामविकास मंडळाला तीन जागा मिळाल्या. या पॅनलचं नेतृत्त्व रामभाऊ रहाणे करत होते. चंदनापुरी हे गाव रहाणेंचं गाव म्हणून ओळखलं जातं.

आजी झेलूबाईचा लाडका अजिंक्य

अजिंक्य रहाणे हा आजी झेलूबाई यांचा अत्यंत लाडका नातू आहे. अजिंक्य रहाणेच्या गावातील बंगल्याचं नावही झेलू आहे. झेलू आजीने वयाची शंभरी पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झेलू आजीनेही मतदानाचा हक्क बजावला होता.

मैदान राजकीय असो की क्रिकेटचं, रहाणेंचा दबदबा ठरलेला असतो हे आजच्या दोन्ही निकालांवरुन स्पष्ट होतंय. नगरचा हा सुपुत्र ब्रिस्बेनमध्ये गुलाल उधळतोय, तर रहाणेंचं पॅनेल चंदनापुरीत जल्लोष करतंय.

(Ajinkya Rahane team india beat Australia also Rahane panel wins Chandanapuri Gram Panchayat election)

दुपारच्या हेडलाईन्स

संबंधित बातम्या  

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू   

लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय