मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात आज पहिला T20 सामना पावसामुळे थांबला आहे. न्यूझिलंड दौऱ्यावर सध्या टीम इंडियाचे अनेक युवा खेळाडू पाठवण्यात आले आहेत. हार्दीक पांड्याला (Hardik Pandya) न्यूझिलंडविरुद्ध टी 20 मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आलं आहे. त्यामुळे पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी केल्यापासून टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.
वरिष्ठ खेळाडूंना आराम दिल्यानंतर सुद्धा टीम इंडियामध्ये पृथ्वी शॉला संधी न दिल्याने माजी खेळाडू आकाश चोप्रा नाराज आहे. जलदगतीने क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पृथ्वी शॉला ज्यावेळी मालिकेसाठी डावलण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने त्यांच्या सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. पृथ्वी शॉने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली खेळी केली आहे. आयपीएलच्या छोट्या फॉरमॅटसाठी तो अधिक प्रसिद्ध आहे.
आकाश चोप्राने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये पृथ्वी शॉला संधी का दिली नाही, याबाबत लवकरचं प्रश्न विचारणार असल्याचं म्हटलं आहे. बीसीसीआयने टीम इंडियामध्ये लवकरचं बदल करणार असल्याचे सांगितले आहे.