सिडनी (आस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर जेम्स फॉकनरने काल मोठ्या थाटामाटात स्वत:चा वाढदिवस साजरा केला. फॉकनरने वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोवरून तो समलैंगिक (Gay) असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत जेम्सने इनस्टाग्रामवर नुकतंच नवीन पोस्ट करत, गे नसल्याचं स्पष्टीकरण दिली आहे.
जेम्सने काल म्हणजे सोमवारी 29 एप्रिल रोजी 29 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने जेम्सने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत स्वत: जेम्स फॉकनर त्याची आई रोस्लिन कैरोल फॉकनर आणि बॉयफ्रेंड रोबजुबस्तासोबत जेवताना दिसत आहे. बर्थडे डिनर विथ बॉयफ्रेंड रॉबजुबस्ता आणि आई रोस्लिन कैरोल फॉकनर’ अस कॅप्शन जेम्स फॉकनरने या फोटोला दिले आहे. त्यासोबतच त्याने गेल्या 5 वर्षांपासून एकत्र असल्याचंही त्या फोटोखाली लिहिलं आहे. जेम्सने पोस्ट खाली दिलेल्या या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी तो समलैंगिक असल्याचं म्हटलं होतं.
जेम्सने केलेल्या या खुलासामुळे त्याच्या क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे जेम्स फॉकनर आणि रॉब लवकरच विवाहबंधनात असल्याच्या अनेक चर्चाही क्रिकेटविश्वात रंगल्या होत्या.
यानंतर नुकतंच जेम्स फॉकनर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. “मी काल (29 एप्रिल) रात्री टाकलेल्या पोस्टमुळे मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. मी गे नाही, पण एलजीबीटी कम्युनिटीकडून मिळालेला पाठिंबा पाहून मला आनंद झाला. प्रेम हे प्रेम असते, ते कधीही विसरता येत नाही. पण मी आणि रॉब गेल्या पाच वर्षापासून हाऊसमेट असून चांगले मित्र आहोत. काल रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षाच्या मैत्रीचे सेलिब्रेशन केलं. माझ्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत धन्यवाद” असे जेम्सने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जेम्स फॉकनरने आतापर्यंत एक टेस्ट मॅच, 69 एकदिवसीय सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. त्याशिवाय त्याने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. जेम्सने ऑक्टोबर 2017 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याशिवाय पुणे वॉरियर्स, गुजरात लाईन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स यांसह विविध आयपीएल टीममध्ये जेम्सचा सहभाग होता.