लंडन : टीम इंडियाने या विश्वचषकात विजयी सलामी दिल्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होतोय. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता तगड्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. भारतीय संघ हे आव्हान पेलण्यासाठी पूर्ण सज्ज झालाय. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात ठोकलेलं शतक आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी याच्या बळावर ऑस्ट्रेलियावर सहज मात करण्याचा भारतीय संघाला विश्वास आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवली होती. यावेळी अंतिम अकरा खेळाडूंमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. मधल्या फळीत गेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि केएल राहुल यांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचा शोधही थांबलाय असं म्हणता येईल. याशिवाय केदार जाधव हा कोणत्याही ठिकाणी फिट असणारा पर्याय भारताकडे असणं ही जमेची बाजू आहे.
रोहित शर्माला पहिल्या सामन्यात गवसलेला सूर या सामन्यातही कायम राहण्याची अपेक्षा आहे. शिवाय सलामीवीर शिखर धवनला अजून सूर गवसलेला नाही. त्यामुळे यावेळी सलामीच्या जोडीवर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ पाहता पहिल्यांदा फलंदाजी केल्यास मोठं आव्हान देणं भारतासाठी गरजेचं असेल.
ऑस्ट्रेलियाच्या जमेच्या बाजू काय?
एक वर्षानंतर पुन्हा मैदानात परतलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा सूर गवसलाय. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करत आपण पुन्हा सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. शिवाय नाथन कल्टर नाईल हा अष्टपैलू खेळाडूही भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतो. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांचा फॉर्म भारतीय फलंदाजांसाठी सावधगिरी बाळगण्याचे संकेत देतो. डेव्हिड वॉर्नरही आयपीएलपासून जबरदस्त फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर आता स्थान कायम राखण्याचं आव्हान आहे.
ऑस्ट्रेलिया संघ दोन विजय मिळवल्याने तिसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. तर दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केल्याने भारतीय संघाचाही आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही. सद्यपरिस्थितीमध्ये दोन्ही संघाकडे स्वतःला सिद्ध करणारे गोलंदाज आणि फलंदाज आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ
विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमरा, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया संघ
एरॉन फिंच, एलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, नाथन कल्टर नाईल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, शॉन मार्श, केन रिचर्ड्सन, जेसन बेहरनड्रॉफ, नाथन लायन