मुंबई : ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 279 धावा केल्या. कॅमरोन ग्रीनने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. तर स्टीव्ह स्मिथ या सामन्यात मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. त्याने 71 चेंडूंचा सामना करत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार मारले. असं असताना एक बाब त्याने क्रिकेट मंडळाच्या निदर्शनास आणून दिली आहे. वारंवार त्या क्लुप्तीचा वापर करून गोलंदाज फलंदाजांना अडचणीत आणत असल्याचं सांगितलं. टी20 मधील रणनिती कसोटीत अवलंबली जात असल्याने फलंदाजी करताना अडचण येते, असं स्टीव्ह स्मिथचं म्हणणं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा वेग कमी करण्यासाठी गोलंदाज लेग साईट बाउन्सरचा वापर करतात. त्यामुळे या प्रकारच्या चेंडूची संख्या मर्यादीत करण्याची मागणी केली आहे. तसेच निवेदनात अडचणींचा पाढा वाचला आहे.
“लेग साईट बाउंसर टाकण्याच्या नियमात बदल करणं गरजेचं आहे. विकेटसमोर शॉट्स खेळता येत नाहीत. असा चेंडू वाईड घोषित करावा किंवा गोलंदाजाला एक वॉर्निंग द्यावी. फिरकीपटूंचा हाच नियम वेगवान गोलंदाजांसाठीही हवा. एक किंवा दोन चेंडूंनंतर चेतावणी दिली जावी आणि असे चेंडू वाईड घोषित करावेत. लेग साईडला चेंडू येत असल्याने स्ट्रोक खेळणं कठीण आहे.”, असं स्टीव्ह स्मिथने आपल्या निवेदनात म्हंटलं आहे. गेल्या काही वर्षात गोलंदाजानी स्टीव्ह स्मिथविरुद्ध लेग साईड बाउन्सरचा वापर केला आहे. यात स्मिथला अनेकदा विकेट गमवावी लागली आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरोन ग्रीन वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॅमरोन ग्रीन नाबाद 103 आणि जोश हेझलवूड नाबाद 0 या धावसंख्येवर खेळत आहे. या सामन्यातील जय पराजय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बदलणार आहे.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी (कर्णधार), स्कॉट कुगेलिजन, विल्यम राउर्के
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.