टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान संपुष्टात आलं आहे. 25 जून रोजी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांग्लादेशला हरवताच ऑस्ट्रेलियाचा धाकड संघ हा वर्ल्डकप मधून बाहेर फेकला गेला. तत्पूर्वी सुपर 8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला. त्यामुळे आता वर्ल्डकप जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं आहे. याच दरम्यान जयपूर पोलिसांनी ऑस्ट्रेलिय टीमशी संदर्भात एक ट्विट त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केलं, मात्र मजेत करण्यात आलेल्या या एका पोस्टमुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. काय आहे त्यांचं ते ट्विट आणि एवढा वाद का झाला ? चला जाणून घेऊया.
खरंतर ‘अतिथि देवो भव’चा गजर करणाऱ्या यजपूर पोलिसांच्या एका मीमची, ट्विटची सध्या बरीच चर्चा होत आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियामधील मॅचशी निगडीत हे मीम असून त्यामध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडू पोलिसांच्या वेषात दाखवण्यात आले. तर ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू ट्रेव्हिस हेड याला एखाद्या आरोपीच्या रुपात दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर जयपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट शेअर करण्यात आलं, मात्र ही मजा लोकांना काही फारशी रुचली नाही,उलट अनेक लोक भडकलेच. ’19 नोव्हेंबरपासून शोध सुरू होता, आता पकडलं’ असं ट्रेव्हिस हेडला आरोपी दाखवण्यात आलेल्या फटोोखाली लिहीण्यात आलं होतं.
मात्र या पोस्टमुळे गोंधळ माजला असून अनेक जण जयपूर पोलिसांवर भडकले आहेत. आणि त्यामागचं कारण म्हणजे या पोस्टच्या एक दिवस आधीच त्यांनी केलेली एक कारवाई होती. खरंतर परदेशातील महिलांसोबत असभ्य रितीने वर्तन करणाऱ्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या एका युवकाला जयपूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता त्याच पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूबद्दल हे मीम करत शेअर केले. त्यांचं हे ट्विट अनेकांनी रिट्वीट केलं.. हे कसलं अतिथी देवो भव ? असा सवाल विचारत अनेकांनी जयपूर पोलिसांवर टीकाही केली आहे.
जयपूर पोलिसांचं एक पाऊल मागे
मात्र, हा वाद वाढत असल्याचे पाहत जयपूर पोलिसांनी एक पाऊल मागे टाकत हे ट्विटच डिलिट करून टाकलं. त्यापूर्वी त्यांनी हे मीम शेअर करतानाच ‘किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे’ अशी कॅप्शन लिहील होती. पण वाद वाढल्याने आता हे ट्विट हटवण्यात आलं आहे.
दरम्यान, मला या ट्विट बद्दल कसलीही माहिती नाही. सोशल मीडियाची एक वेगळी टीम आहे जी हे काम पाहते. त्यांनी नक्की काय लिहीलं आणि ते का लिहीण्यात आलं होत, याचा आपण शोध घेऊ असे जयपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाश बिश्नोई या मीमबाबत म्हणाले.
T20 विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करून वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. सुपर 8 च्या या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने 92 धावांची तूफानी खेळी केली तर ट्रॅव्हिस हेडने त्यांच्या संघासाठी सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी अपयशी ठरली आणि ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. यावरच जयपूर पोलिसांनी एक मीम बनवला, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि विराट कोहली जयपूर पोलिसांच्या गणवेशात दाखवण्यात आले आहेत. तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ट्रॅव्हिस हेडला गुन्हेगारासारखे खाली बसलेले दाखवले होते. सोबतच ‘आम्ही १९ नोव्हेंबरपासून शोध घेत होतो आणि आता पकडले आहे’, असेही लिहिले होते.
सध्या, भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 27 जून रोजी रात्री 8 वाजता गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध सामना होईल. या सामन्यात जिंकलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल. 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.