नवी दिल्ली : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणारी भारताची स्टार महिला शटलर पी. व्ही. सिंधूचं (P V Sindhu) भारतात पोहोचताच जोरदार स्वागत झालं. त्यानंतर सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींनी ट्विटरवर या भेटीचे काही फोटो पोस्ट केले.
India’s pride, a champion who has brought home a Gold and lots of glory!
Happy to have met @Pvsindhu1. Congratulated her and wished her the very best for her future endeavours. pic.twitter.com/4WvwXuAPqr
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2019
“ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. एक चॅम्पियनने सुवर्ण जिंकलं आणि घरी परतली. पी व्ही सिंधूला भेटून आनंद झाला. तिला तिच्या या यशासाठी आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केलं.
मोदींना भेटण्यापूर्वी सिंधूने केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांची भेट घेतली. सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून भारताचा मान वाढवला आहे, अशी प्रितिक्रिया यावेळी रिजिजू यांनी दिली. तसेच, सिंधूला चेक स्वरुपात 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं.
सिंधू मंगळवारी सकाळी भारतात परतली. यावेळी विमानतळावरही तिचं भव्य स्वागत करण्यात आलं.
सिंधूकडून ओकुहाराचा पराभव
ऑलिम्पिक रजत पदक विजेती सिंधूने रविवारी (25 ऑगस्ट) स्विट्जरलंडच्या बासेल येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. तिने जगातील चौथ्या क्रमांकाची खेळाडू जपानची नोजोमी ओकुहाराला (Nozomi Okuhara) 21-7, 21-7 ने पराभूत करत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकलं.
सिंधूकडून 2017 च्या पराभवाचा बदला
याआधी सिंधू 2018 मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरीन आणि 2017 मध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराविरोधात अंतिम सामना खेळली होती. मात्र दोन्ही वेळी तिला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही. यावेळी तिने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर 2017 चा बदला घेतला आणि ओकुहाराला पराभवाची धुळ चारली.
संबंधित बातम्या :
तिरंगा फडकला, राष्ट्रगीत सुरु झालं, अभिमानाने ऊर भरुन सिंधूच्या डोळ्यात अश्रू तरळले
सिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल
पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय