मुंबई: महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुममध्ये येऊन आपल्या कसरती दाखवल्या. बालाने न्यूजरुममध्ये जोर-बैठका मारल्याच, शिवाय पत्रकारांसोबत पंजाही लढवल्या. बाला रफिक शेखने टीव्ही 9 च्या न्यूजरुमच्या आपला महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास उलगडलाच, शिवाय भविष्यातील प्लॅनिंग काय काय आहेत, याचीही माहिती दिली.
टीव्ही 9 च्या न्यूजरुममध्ये पत्रकार गिरीश गायकवाड यांच्यासोबत बाला रफिक शेखने डिप्स मारले. दोघांमध्ये स्पर्धा झाली. त्यामध्ये बाजी अर्थातच महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने मारली.
यंदा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणारच हे माझं ध्येय होतं. त्यादृष्टीने माझी तयारी सुरु होती, असं बाला रफिक शेखने सांगितलं. सर्व चर्चा सुरु असतानाच बालाने दंड बैठका मारुन दाखवल्या.
कोण आहे बाला रफिक शेख?
बाला रफिक शेख हा मूळचा सोलापूरचा आहे. तो कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. त्याच्या घरात 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आली आहे. बाला रफिक शेखचे वजन-120 किलो, तर उंची-6 फूट आहे. बाला रफिक शेख वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटलांकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. तो सध्या पुण्याच्या हनुमान आखाड्यात सराव करतो.
बाला रफिकच्या घरची परिस्थिती बिकट. पैलवानाला लागणारा दोन वेळचा हवा तसा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. तरीही आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे सिद्ध करुन दाखवले की, परिस्थिती कशीही असेल, तरीही जर आपण ठरवलं तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.