टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाली संधी ते जाणून घ्या

| Updated on: Apr 30, 2024 | 4:49 PM

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासाठी खलबतं सुरु होती. मात्र बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया 5 जूनला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाली संधी ते जाणून घ्या
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये कोणते खेळाडू खेळणार आणि कोण नाही? याची बरीच चर्चा रंगली होती. आता या सर्व चर्चांवर पडदा पडला आहे. बीसीसीआयने डेडलाईनच्या एक दिवस आधी टीम इंडियाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर भारताने टीमची घोषणा केली आहे. उपकर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात की ऋषभ पंतच्या यावरून चर्चा रंगली होती. मात्र यावरही आता पडदा पडला आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. तर संजू सॅमसनची निवडही संघात झाली आहे. शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद आणि आवेश खान यांना राखीव खेळाडू म्हणून घोषित केलं आहे. एका अर्थाने या खेळाडूंना संघात एखादा खेळाडू जखमी झाला तरच संधी मिळू शकते. तर  केएल राहुल याचा पत्ता वर्ल्डकप संघातून कापला आहे.

फलंदाजीची धुरा रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन यांच्या खांद्यावर असेल. हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावतील. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्या खांद्यावर फिरकीपटूची जबाबदारी असेल. अर्शदी सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. युझवेंद्र चहलची संघात निवड झाली असून टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. गेल्या काही वर्षात युझवेंद्र चहलला टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. चहलने आयपीएल 2024 स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली असून पर्पल कॅपच्या शर्यतीत कायम असल्याचं दिसून आला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होईल. मात्र भारतीय वेळेनुसार स्पर्धा 2 जूनपासून सुरु होईल. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडसोबत आहेत.भारताचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला आहेत. ही स्पर्धा 29 जूनपर्यंत असणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला आहे. चार गटात या संघांची विभागणी करण्यात आली आहे. भारताच अ गटात असून या गटात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी चषकांपासून टीम इंडिया वंचित आहे. शेवटचा आयसीसी चषक महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात 2013 मध्ये जिंकला होता. त्यानंतर 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकण्याची संधी होती. मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. आता पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करावं अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान