आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात पुढल्या महिन्यात, अर्थात 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे. पपण बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यास विलंब होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे मुख्य सिलेक्टर अजित आगरकर हे आयसीसीच्या सूचनेनुसार वेळेवर भारतीय संघाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. पण ताज्या माहितीनुसार बीसीसीआय आता संघाच्या घोषणेसाठी आयसीसीकडून काही वेळ मागू शकते. मात्र इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी20 सीरिजसाठी दोन ते तीन दिवसांत भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.
कधी होणार संघाची घोषणा ?
कोणत्याही स्पर्धेला सुरूवात होण्याच्या 4 आठवडे आधी सर्व संघांनी आपल्या प्रोव्हिजनल स्क्वॉडची घोषणा करण्यात यावी असे आयसीसी तर्फे सांगण्यात येतं. त्यानंतर त्या संघात बदल करण्यासाठीही वेळ मिळतो. पण पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 ही संघानी 5 आठवडे आधीच संघाची घोषणा करण्यात यावी, असे आयसीसीतर्फे सांगण्यात आलं. 12 जानेवारीपर्यंत आपल्या टीमची यादी द्यावी, असे निर्देश सर्वांना देण्यात आले होते.
पण क्रिकबझच्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर बीसीसीआय संघाच्या घोषणेसाठी एका आठवड्याने विलंब करू शकते. भारतीय संघाची घोषणा करण्यासाठी थोडा वेळ मिळावा अशी बीसीसीआयकडून आयसीसीला करण्यात येणार असल्याचे समजते. 18-19 जानेवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. इंग्लंड व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाने आत्तापर्यंत आपला संघ जाहीर केलेला नाही.
इंग्लंड सीरिजसाठी कधी जाहीर होणार भारतीय संघ ?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ 22 जानेवारीपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. तर 6 फेब्रुवारीपासून 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. रिपोर्ट्सनुसार, टी-20 मालिकेसाठी संघाची यादी दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरलेले खेळाडू या मालिकेत खेळतील अशी अपेक्षा आहे. एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा होण्यास आणखी थोडा वेळ लागू शकतो.
या खेळाडूंना मिळणार संधी ?
टी-20 मालिकेत अर्शदीप सिंग हा पेस अटॅक करताना दिसतो, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच सीनियर गोलंदाज मोहम्मद शमीच्याही खेळण्याची फारशी आशा नाही. मात्र, तो सुमारे दीड वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
शमीने अलीकडेच पश्चिम बंगालच्या वतीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता. रिपोर्टनुसार शमीला बीसीसीआयची सेंटर ऑफ एक्सलन्स क्लिअरन्स मिळाली आहे. तसे झाले नसेल तर काही दिवसांत हे घडू शकेल. त्यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जैस्वाल एकदिवसीय मालिकेत, तर नितीश कुमार रेड्डी फक्त टी-20 मालिकेत दिसणार आहेत.