भारतीय संघाचा नुकताच झालेला ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय खराब होता. 5 सामन्यांच्या टेस्ट मॅच सीरीजमध्य भारतीय संघाला 3-1 असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं, काही वाद झाला, याबद्दलच्या अनेक बातम्या, अफवा समोर आल्या होत्या, ज्यामुळे खळबळ माजली होती. काही रिपोर्ट्समध्ये तर असाही दावा करण्यात आला की कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात काहीही आलबेल नाही, दोन्ही दिग्गजांमध्ये अनेक मतभेड असल्याचीही चर्चा सुरू होती. याआधीही भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेदरम्यान दोघांमध्ये संघ चालवण्यावरून वाद झाल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता. आता बीसीसीआयतर्फे या मुद्यांवर मोठा खुलासा करण्यात आसा आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित-गंभीरमधील मतभेदांवर राजीव शुक्लांचे मोठे वक्तव्य
कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांच्यात संघातील निर्णय आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत मतभेद असल्याच्या बातम्या गेल्या काही काळापासून समोर येत होत्या. तसेच ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान, गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये सीनियर खेळाडूंची शाळा घेत चांगलीच खरडपट्टी काढली होती, अशी माहितीही समोर आली होती. या टेस्ट मॅच सीरिजच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा संघाबाहेर बसला होता, त्याने स्वत:च हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर रोहित आणि गंभीर यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांनी जोर पकडला होता. दुसरीकडे, विराट कोहलीसह संघातील इतर वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीबाबत मतभेद असल्याचेही अंदाज व्यक्त होत आहेत. मात्र आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
‘हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक यांच्यात मतभेद नाहीत, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातही काही वाद किंवा मतभेद नाहीत. हा सगळा मूर्खपणा आहे, जो मीडियाच्या एका विभागात पसरवला जात आहे’ असे राजीव शुक्ला म्हणाले.
रोहित शर्माचे केले समर्थन
सध्या खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या रोहित शर्माचेही शुक्ला यांनी समर्थन केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजमध्ये 3 सामन्यांत तो फक्त 31 धावा करू शकला होता. चांगला खेळ दाखवा किंवा संघाबाहेर बसण्यासाठी तयार रहा, असं अल्टीमेटम गौतम गंभीरने सीनिअर खेळाडूंना दिलं होतं, अशी बातमीही सीरिजदरम्यान समोर आली होती. यावर राजीव शुक्ला म्हणाले, ‘रोहितने कर्णधारपदाचा आग्रह धरला ही बातमी देखील चुकीची आहे, तो कर्णधार आहे. फॉर्ममध्ये असणे किंवा नसणे हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. तो फॉर्ममध्ये नसल्याचे पाहून त्याने स्वत:ला पाचव्या कसोटीतून संघातून बाहेर काढले’ असे ते म्हणाले. याशिवाय संघाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी नुकतीच घेतलेली आढावा बैठक पूर्ण झाल्याचेही शुक्ला यांनी सांगितले. आम्ही पुढे जाण्याचा मार्ग आणि चांगले काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितलं.