कोलकाता : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) सहभागी झालेल्या दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. चेन्नई सुपरकिंग्सचे (Chennai Superkings) खेळाडू दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांच्या कोव्हिड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असून आपल्या संघासाठी मैदानात योगदान देत आहेत. याचदरम्यान भारतात 37 क्रिकेट खेळाडूंच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये दोन खेळाडू कोरोनाबाधित आढळले आहेत. (Bengal cricketer Mukesh Kumar tested Covid Positive)
ईएसपीएन क्रिकइन्फो च्या रिपोर्टनुसार बंगालचा जलदगती गोलंदाज मुकेश कुमार आणि डावखुरा फिरकी गोलंदाज श्रेयन चक्रवर्ती कोव्हिड चाचणीत बाधित आढळले आहेत. जलदगती गोलंदाज मुकेश कुमार याने 22 प्रथम श्रेणी सामन्यात 80 तर लिस्ट ए क्रिकेट सामन्यांमध्ये 5 बळी घेतले आहेत. तर फिरकीपटू श्रेयन चक्रवर्ती याने केवळ दोनच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये योगदान दिलं आहे. त्यात त्याने तीन बळी मिळवले आहेत.
37 खेळाडूंपैकी 16 महिला
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) बुधवारी खेळाडू आणि कॅबशी संबंधित लोकांच्या कोव्हिड-19 चाचण्या करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 63 जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 37 खेळाडूंचा (21 पुरुष व 16 महिला खेळाडू) समावेश होता.
खेळाडूंची कोव्हिड चाचणी करण्याची प्रक्रिया बंगाल क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष नरेश ओझा यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली. ओझा कॅबच्या कोव्हिड टास्क फोर्सचे चेअरमनदेखील आहेत. ओझा यांनी सांगितले की, ”खेळाडूंसह प्रशिक्षक, फिजियो, हाऊसकिपिंग, सुरक्षारक्षक आणि पंचांच्यादेखील कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत”.
कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले की, ”जे लोक कॅबशी संबधित आहेत अशा लोकांच्या कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत”. दरम्यान भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल मोसमाचे (13 वा सीजन) यूएईमध्ये आयोजन केले आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | आरारा खतरनाक! राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू
(Bengal cricketer Mukesh Kumar tested Covid Positive)