लंडन : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेनंतर ख्रिस गेल निवृत्ती घेईल. तो सध्या विश्वचषकात खेळत आहे. विश्वचषकात वेस्ट इंडिजचा पुढील सामना भारतीय संघासोबत होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यात तीन टी-20, 3 वन डे आणि काही कसोटी सामने खेळणार आहे.
टी-20 चा बादशाह ख्रिस गेलने वेस्ट इंडिजला अनेक सामने जिंकून दिले आहेत. कसोटीमध्ये 333 धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजकडून 103 कसोटी सामने खेळले आहेत. शेवटचा कसोटी सामना त्याने सप्टेंबर 2014 मध्ये खेळले आहेत. अखेरची कसोटी मालिका खेळून निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी ख्रिस गेलचा कसोटी संघात समावेश केला जातो की नाही तेही पाहणं महत्त्वाचं असेल.
विश्वचषकात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
विराट कोहलीच्या टीम इंडियाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानवर विजय मिळवला. आता पुढील लढत वेस्ट इंडिजशी होणार आहे. अफगाणिस्तानवरील विजयासह भारत विश्वचषकात अजून अपराजित आहे. दुसरीकडे विंडीजचा संघ संघर्ष करतोय. सहापैकी एका सामन्यात विजय मिळवून इंडिज संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.
भारत – विंडीज सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचं सेमीफायनलकडे आणखी एक पाऊल पडेल. तर, दुसरीकडे सततच्या पराभवाने विंडीज मात्र सेमीफायनलसाठी पात्र होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. पण भारतासाठी विंडीजचे तीन खेळाडू घातक ठरू शकतात. कार्लोल ब्रेथवेट, शेल्डन कॉट्रेल आणि ख्रिस गेल हे तीन खेळाडू भारताची डोकेदुखी ठरू शकतात.
विंडीजचा हुकमी एक्का कार्लोल ब्रॅथवेट
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विंडीजचा पराभव झाला तरीही ब्रेथवेट नावाच्या वादाळाने मात्र हरूनही सर्वांची मनं जिंकली. ब्रॅथवेट, ज्याने 2016 च्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सची धुलाई केली होती. अखेरच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज असताना ब्रॅथवेटने स्टोक्सची धुलाई करत सलग चार खणखणीत सिक्स ठोकत विंडीजला ट्वेंटी-ट्वेंटीचा वर्ल्डकप आणून दिला आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही त्याची खेळी अशीच दिसून आली. त्यामुळे विंडीजचा हा हुकमी एक्का भारतासामोर एक मोठं आव्हान ठरू शकतं.
भारतीय फलंदाजांची डोकेदुखी – शेल्डन कॉट्रेल
शेल्डन कॉट्रेल हा विंडीजचा वेगवान गोलंदाज यंदाच्या विश्वचषकात फक्त त्याच्या गोलंदाजीमुळेच नव्हे तर, फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमुळेही चर्चेत आलाय. 6 सामन्यात 6 विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजचा आघाडीचा गोलंदाज ठरण्याचा किताबही शेल्डन कॉट्रेलने मिळवलाय. उत्तम गोलंदाजी, उल्लेखनीय झेल, रन-आउट त्याच्या या योगदानामुळे कॉट्रेलचं क्षेत्ररक्षण विडींजसाठी एक्स-फॅक्टर ठरतो. कॉट्रेल हा डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने भारतीय फलंदाजांना अजून सावध राहण्याची गरज आहे.
कधीही बरसणारा ख्रिस गेल
‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा फॉर्म यंदाच्या विश्वचषकात अद्याप तरी दिसला नाही. पण भारतीय गोलंदाजासमोर गेलचं आव्हान मात्र कायम असेल. गेलने आतापर्यंत 38.8 च्या सरासरी 194 धावा केल्या आहेत, तर गुणतालिकेत अव्वल राहिलेल्या न्यूझीलंडविरुद्ध मात्र गेलने चांगली कामगिरी करत 84 चेंडूत 87 धावा केल्या. भारताच्या फिरकी गोलंदाजांना गेलपासून धोका आहे. फिरकी गोलंदाजांविरोधात गेलची बॅट मात्र आपली खेळी चांगलीच दाखवते. भारत विरुद्ध एकदिवसीय सामन्यात गेलने चार शतकं आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने आतापर्यंत 1000 धावा पूर्ण केल्यात. त्यामुळे विंडीजसाठी गेल हा एक महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.
कार्लोस ब्रेथवेट आणि ख्रिस गेल यांना रोखण्यासाठी भारताकडे वेगवान गोलंदाज युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक करणारा मोहम्मद शमीसारखा खेळाडूही भारताकडे आहे. यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक सामन्यात भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही जमेच्या बाजूंमुळे भारताने एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे विडींजला सहापैकी अवघ्या एका सामन्यात विजय मिळालाय. त्यामुळे नक्कीच या सामन्यात देखील भारताचं पारडं जड आहे.
संबंधित बातम्या :