मुंबई : भारतात क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असतो. क्रीडाप्रेमी सामन्याचे प्रत्येक अपडेट घेत असतात. सोशल मीडिया किंवा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद लुटतात. मात्र गेल्या काही वर्षात भारताच्या पदरी आयसीसी चषकांचा दुष्काळ पडला आहे. भारतानं गेल्या दहा वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये शेवटची चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकली होती. आता त्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे जेतेपदासाठी क्रीडाप्रेमींमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. दरम्यान माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आपलं मत मांडलं आहे.
“मला वाटतं भारताला जिंकणं बाकी आहे. संघ सातत्याने अंतिम, उपांत्य फेरीत धडक मारत आहे. तुम्ही सचिन तेंडुलकरकडे बघा. एका आयसीसी ट्रॉफीसाठी त्याला सहा वर्ल्डकप खेळावं लागलं. 6 वर्ल्डकप म्हणजे 24 वर्षे. शेवटच्या वर्ल्डकपमध्ये त्याला यश मिळालं. लियोनल मेस्सी हे देखील उत्तम उदाहरण आहे. किती वर्षांपासून फुटबॉल खेळत होता. एकदा जिंकायला सुरुवात केली ती वर्ल्डकपपर्यंत. कोपा अमेरिका आणि वर्ल्डकपवर नाव कोरलं. त्यामुळे आपल्याला सुद्धा वाट पाहावी लागेल.”, असं रवि शास्त्री यांनी सांगितलं.
भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप 2015 आणि 2019 च्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. टी 20 वर्ल्डकप 2014 च्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागला. तर 2016 आणि 2022 टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. 2021 टी 20 वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता.
चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.त्यामुळे भारतीय संघ कधी आयसीसी ट्रॉफी जिंकणार असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहेत. आता भारताला दोन आयसीसी स्पर्धांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे संघाला खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. अंतिम फेरीचा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात 7 जून रोजी असणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2023 पासून भारतात वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकप भारतातच असल्याने भारतीय संघाला जिंकण्याची उत्तम संधी आहे. वनडे आणि टेस्ट क्रिकेट संघांचं रोहित शर्माकडे नेतृत्व आहे. पण ऐन मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींना चिंता सतावत आहे.
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय वेगवान गोलंदाजीचं कंबरडं मोडलं आहे. तर गोलंदाजांना विदेशी धरतीवर लय मिळवण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत वेगवान गोलंदाजांचा कस लागणार आहे.