मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा लाकडाऊन लावला जाईल, अशा शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. देशात त्यातही प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगातली सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. आयपीएलची तयारी करत असलेल्या तीन खेळाडूंना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक संघ आणि बीसीसीआय सध्या चिंतेत आहेत. (Covid-19 scare hits IPL 2021, BCCI can Shift matches from Mumbai to Hyderabad)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाली आहे. काल (3 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला पहिला सामना 10 एप्रिल रोजी मुंबईत खेळणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाचा कोरोनो रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. परंतु त्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या संघात सहभागी झाला आहे. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे बीसीसीआयचे अधिकारी चिंतेत आहेत.
सध्या आयपीएलमधील पाच संघ मुंबईत असून मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघातील खेळाडू मुंबईत आहेत. बीसीसीआयने याक्षणी कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील सामने शिफ्ट केले जाऊ शकतील, अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, येत्या 48 तासांचे निरीक्षण करूनच निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत सर्व खेळाडूंना कडक प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले गेले आहे आणि कोणत्याही प्रकारे बायो बबलमधून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बीसीसीआयकडे काही मार्ग आहेत ज्याद्वारे बीसीसीआय प्रयत्न करू शकते. त्याची चाचपणी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना चाचणी दररोज होईल – बीसीसीआय खेळाडूंची कोरोना चाचणी रोज करु शकते. सध्या दर तीन दिवसांनी कोरोना चाचणी घेतली जाते, परंतु सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी बीसीसीआय दररोज चाचण्या घेऊ शकते.
संबंधित बातम्या
IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला झटका, सलामीवीराला कोरोनाची लागण
IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण
(Covid-19 scare hits IPL 2021, BCCI can Shift matches from Mumbai to Hyderabad)