आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव सुरु आहे. या मेगा लिलावात दिग्गज खेळाडूंच्या नशिबाचा फैसला होणार होता. कारण आयपीएलमध्ये 204 स्लॉटसाठी खेळाडूंवर बोली लावली जात आहे. 577 खेळाडूंपैकी कोणच्या ना कोणाच्या पदरी निराशा पडणार हे माहिती होतं. पण काही दिग्गज खेळाडूंना फ्रेंचायझींनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे क्रिकेट करिअरच संपलं अशी चर्चा क्रीडावर्तुळात सुरु झाली आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलो तो दिग्गज खेळाडूंकडे फ्रेंचायझींनी पाठ फिरवल्याचं पाहून. पहिल्या दिवशी डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, देवदत्त पडिक्कल, पियुष चावला यांना डावललं. दुसऱ्या या यादीत आणखी भर पडली. या यादीत शार्दुल ठाकुर, अजिंक्य रहाणे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, केएस भारत यांची भर पडली. या यादीत आणखी नाव होतं ते 25 वर्षीय पृथ्वी शॉचं.. खरं तर लहान वयातच पृथ्वी शॉने नावलौकिक मिळवला होता. त्याला सचिन तेंडुलकरचा वारसदार म्हणून क्रीडाप्रेमींनी डोक्यावर घेतलं होतं. पण त्याच्या क्रीडा कारकिर्दिला नजर लागल्यासारखं झालं. वारंवार संधी मिळूनही काही खास करू शकला नाही. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली लिटमस टेस्ट करत आहे. असं असताना आयपीएल लिलावात त्याला धक्का बसला आहे.
पृथ्वी शॉने स्वत:चा फॉर्म पाहता आपली किंमत फक्त 75 लाख रूपये ठेवली होती. कॅप्ड प्लेयर असूनही इतकी कमी किंमत ठेवल्यानंतर सर्वकाही लक्षात आलं होतं. कमी किंमतीत एखादी फ्रेंचायझी डाव लावेल अशी अपेक्षा होती. पण त्याचा फॉर्म पाहता कोणीच बोली लावली नाही. ऑक्शनर त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर फ्रेंचायझींकडे वारंवार आशेने पाहात होती. कोणीतरी पेडल उचलेल. पण तसं झालं नाही आणि तिला प्लेयर अनसोल्ड अशी घोषणा करावी लागली. एकतर टीम इंडियात स्थान मिळणं कठीण झालं आहे. दुसरं आता आयपीएलमध्येही डावललं गेलं आहे. त्यामुळे पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दिला फूल स्टॉप लागला की काय अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये 2018 मध्ये दिल्ली कॅपटिल्सने खरेदी केलं होतं. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 10 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. पण 7 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 13 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याला यावेळी कोणीच भाव दिला नाही. टी20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये पृथ्वी शॉ श्रीलंकेविरुद्ध एकमेव सामना खेळला आहे. या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. त्यानंतर त्याला तिथेही संधी मिळाली नाही.