मुंबई : लॉर्ड्सच्या (lords stadium) मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये (ENG vs NZ ) सामना अतिशय जोमात सुरू आहे. या सामन्याच्या प्रत्येक दिवसाचे पहिले सत्र फलंदाजांसाठी अत्यंत जीवघेणे ठरले. तिसऱ्या दिवशीही असाच किस्सा पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी विकेटसाठी झगडणाऱ्या इंग्लंड आणि स्टुअर्ट ब्रॉडने (stuart broad) तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपली चमक दाखवायला सुरुवात केली. ब्रॉडची घातक गोलंदाजी आणि ऑली पोपच्या सावध क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इंग्लंडने तीन चेंडूंत तीन विकेट घेत न्यूझीलंडला चांगलाच ब्रेक लावला. आज पावसामुळे सामन्याला तिसरा दिवस अर्धा तास विलंबाने सुरू झाला आणि त्याचा फायदा यजमान इंग्लंडला मिळाला. शुक्रवारी सुमारे 75 षटकांच्या सामन्यात केवळ चार विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या संघाला शनिवारी फारशी प्रतीक्षा करावी लागली नाही. डॅरिल मिशेलने पहिल्याच षटकात आपले शतक पूर्ण केल्याने पाच मिनिटांतच मोठा घडामोडीत दिसून आल्या.
पाचव्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या ब्रॉडच्या तिसऱ्या चेंडूवर शतकवीर मिशेलची विकेट पडली. ब्रॉडच्या जोरदार चेंडूवर मिशेलला कीपरने झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर नवीन फलंदाज कॉलिन डिग्रँडहोमला त्याच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करावा लागला. त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील होते. पण अंपायरने फेटाळलं. मात्र, तो क्रीजच्या बाहेर गेला आणि अशा स्थितीत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पोपने झटपट स्टंपला चेंडू मारला. यावेळी लगेच त्याला धावबाद करण्यात आलं. यानंतर काइल जेमिसनला पहिल्याच चेंडूवर ब्रॉडने त्रिफळचीत केलं.
न्यूझीलंडचा डाव अवघ्या तीन चेंडूत उलथून टाकला. एका वेळी 4 बाद 251 धावा करणाऱ्या न्यूझीलंडची धावसंख्या या षटकानंतर 7 बाद 251 अशी झाली. ब्रॉडला त्याची हॅट्ट्रीक करता आली नाही. पण, सलग तीन विकेट्स घेत इंग्लंड संघाला हॅट्ट्रीक नक्कीच मिळाली. काही वेळातच जेम्स अँडरसनला दुसरी मोठी विकेट मिळाली. त्याने टॉम ब्लंडेलला एलबीडब्ल्यू बाद करून इंग्लंडला आठवे यश मिळवून दिले आणि ब्लंडेलला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक रोखले. ब्लंडेलने 96 धावांची खेळी खेळली आणि डॅरिल मिशेलसोबत पाचव्या विकेटसाठी 195 धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत आणले. न्यूझीलंडचा डाव 285 धावांवर आटोपला आणि इंग्लंडला 277 धावांचे लक्ष्य मिळाले.
न्यूझीलंड संघाचा सर्वोत्तम फलंदाज मानला जाणारा कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात पूर्णपणे प्लॉप ठरलाय. त्याने आज धावाच केल्या नाहीत, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ दडपणाखाली आला. विल्यमसनने पहिल्या डावात दोन दावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात त्याच्या केवळ पंधरा धावा केल्या. पहिल्या डावात न्यूझीलंडची संपूर्ण फलंदाजी 132 धावात गारद झाली. इंग्लंडने फलंदाजीसह जास्त पुढे जाऊ शकले नाहीत. यजमानांचा डाव 141 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. पण मिशेल आणि ब्लंडलने शानदार भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत आणले.