टीम इंडियाचा पाचव्या कसोटीपूर्वी मोठा निर्णय! रोहित शर्माबाबत चार शक्यतांमुळे गूढ वाढलं

| Updated on: Jan 02, 2025 | 1:55 PM

IND vs AUS : सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये बरंच काही घडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान एका फोटोमुळे या बातमीला आणखी जोर मिळाल्याचं दिसत आहे.

टीम इंडियाचा पाचव्या कसोटीपूर्वी मोठा निर्णय! रोहित शर्माबाबत चार शक्यतांमुळे गूढ वाढलं
Image Credit source: PTI
Follow us on

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. दुसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला समोरं जावं लागलं. या पराभवासाठी रोहित शर्माची फलंदाजी आणि नेतृत्व या दोघांना जबाबदार धरलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पाचव्या कसोटीपूर्वी काही शक्यता पाहता यावर थोडाफार विश्वास ठेवणं भाग पडत आहे. सिडनी कसोटीपूर्वी आलेल्या फोटोमुळे आता विचार करणं भाग पडत आहे.

फिल्डिंग सरावाच्या फोटोत असं काय दडलंय?

सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाने फिल्डिंग प्रॅक्टिस केली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सरावात रोहित शर्मा कुठेच दिसला नाही. खरं तर रोहित शर्मा अशा सरावात आवर्जून भाग घेतो. पण सिडनी कसोटीपूर्वी इतर खेळाडू आपल्या जागेवर फिल्डिंग करताना दिसले. पण रोहित शर्मा कुठेच दिसला नाही. त्याच्या जागी गिलने सराव केला. इतकंच काय तर कोहली, राहुल, नितीश रेड्डी , यशस्वी जयस्वाल यांनी आपल्या जागी फिल्डिंग केली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना प्रश्न पडणार यात काही शंका नाही.

गंभीरने चीफ सिलेक्टर आणि उपकर्णधाराशी केली चर्चा!

प्रॅक्टिस सेशन व्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह ट्रेनिंग सेशन दरम्यान एकमेकांशी सिरिअस चर्चा करताना दिसले. तर दुसऱ्या फोटोत गंभीर अजित आगरकरशी चर्चा करताना दिसत आहे. गंभीरने या दोघांशी चर्चा केली. पण रोहित शर्मा या दोघांशी चर्चा करताना कुठेच दिसला नाही. त्यामुळे बरंच काही शिजत असल्याची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. पण यात कितपत तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे.

कर्णधार खेळणार की नाही? गंभीरला माहिती नाही?

पत्रकार परिषदेत गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडिमार झाला. तेव्हा सिडनी कसोटी रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने या प्रश्नाला बगल देत सांगितलं की, हा निर्णय नाणेफेकीनंतर होईल. अशात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत माहिती नसावं यासाठी आश्चर्य व्यक्त होत आहे.

रोहितने नेटमध्ये फलंदाजी केली पण…

सिडनी कसोटीपूर्वी रोहित शर्माने नेटमध्ये फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला शुबमन गिलही तितक्याच ताकदीने फलंदाजी करताना दिसला. त्यामुळे अंदाज बांधणं खूपच कठीण झालं आहे. आता जे काही होणार ते टॉसनंतर होईल, त्यामुळे आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.