टी20 वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर, अमेरिकेची पहिल्याच फटक्यात मोठी उडी

| Updated on: Jun 14, 2024 | 11:28 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अमेरिकेने पहिल्याच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कमाल केली आहे. पाकिस्तानसारख्या बलाढ्या संघाला नमवल्यानंतर आता मोठी कामगिरी केली आहे. भारतानंतर सुपर 8 फेरीत स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे.

टी20 वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर, अमेरिकेची पहिल्याच फटक्यात मोठी उडी
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अ गटातून भारतानंतर अमेरिकेने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगलं आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला असं काही होईल असं कोणाच्याही ध्यानीमनी नसेल. पण पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून अमेरिकेने आपला रंग दाखवून दिला. इतकंच काय तर सुपर 8 फेरीत धडक मारून स्पर्धेत आगेकूच केली आहे. अमेरिकेने पहिल्यांदा कॅनडाला, त्यानंतर पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला लोळवलं होतं. इतकंच काय तर भारतालाही विजयासाठी चांगलंच झुंजवलं होतं. त्यामुळे अमेरिकेला कमी लेखनं सुपर 8 फेरीतही महागात पडू शकतं. सुपर 8 फेरीसाठी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे ही मैदान ओलं झालं होतं. ग्राउंडमॅन्सनी मैदान सुकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही पावसाचं सावट घोंघावत होतं. अखेर बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. आयसीसीच्या नियमानुसार अमेरिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला.

पावसामुळे सामना रद्द झाला आणि एक गुण मिळाल्याने अमेरिकेला थेट फायदा झाला. गुणतालिकेत पाच गुण मिळवून भारतानंतर सुपर 8 फेरीत स्थान मिळवणारा अ गटातील दुसरा संघ ठरला आहे. या पावसामुळे पाकिस्तानचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. जर तरच्या सर्व आशांवर पाणी फेरलं गेलं आहे. त्यामुळे आता फक्त आयर्लंडविरुद्धचा सामना खेळून मायदेशी परतावं लागणार आहे. अ गटातून पाकिस्तान व्यतिरिक्त कॅनडा आणि आयर्लंडचंही आव्हान संपुष्टात आलं आहे. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतचं आव्हान संपुष्टात आलं. अमेरिकेने सुपर 8 फेरीत धडक मारल्याने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबिर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, ​​बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम , रॉस एडेअर.

युनायटेड स्टेट्स संघ: शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल, मिलिंद कुमार.