हनुमा विहारीच्या पोस्टमधील राजकीय वरदहस्त असलेला क्रिकेटपटू आला समोर, बाजू मांडत म्हणाला…

| Updated on: Feb 26, 2024 | 5:27 PM

रणजी ट्रॉफीत आंध्र प्रदेशाच्या पराभवानंतर बरीच उलथापालथ सुरु आहे. हनुमा विहारीच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. हनुमा विहारीने आपल्या पोस्टमध्ये कर्णधारपद राजकीय खेळाडूच्या बापामुळे गेल्याचं सांगितलं. त्यानंतर आता राजकीय वरदहस्त असलेला खेळाडू समोर आला आहे. त्यानेही आपली बाजू मांडली आहे.

हनुमा विहारीच्या पोस्टमधील राजकीय वरदहस्त असलेला क्रिकेटपटू आला समोर, बाजू मांडत म्हणाला...
Follow us on

मुंबई : अष्टपैलू क्रिकेटपटू हनुमा विहारी गेल्या तासाभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या एका पोस्टमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्णधारपद गेल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्या सामन्यात कर्णधारपद भूषविल्यानंतर त्याला कर्णधारपदावरून दूर सारण्यात आलं. त्यानंतर रिकी भुईने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. उपांत्यपूर्व फेरीत मध्यप्रदेशकडून 4 धावांनी पराभव झाल्यानंतर मनमोकळेपणाने आपली बाजू मांडली. तसेच आंध्र प्रदेशसाठी यापुढे खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. राजकीय नेत्याच्या मुलावर ओरडल्याने ही वेळ आल्याचं त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. त्यानंतर राजकीय नेत्याचा मुलगा कोण? अशी चर्चा रंगली आहे. कोणाच्या वरदहस्तामुळे हनुमा विहारीवर अशी वेळ आली याचीही चर्चा होत आहे. असं असताना राजकारणी वडील असलेला क्रिकेटपटू समोर आला आहे. त्यानेही सोशल मीडियावर पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे.

पृध्वी राज असं त्या क्रिकेटपटूचं नाव आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सर्वांना नमस्कार, तुम्ही ज्या मुलाला कमेंट बॉक्समध्ये शोधत आहात तो मुलगा मी आहे. तुम्ही जे काही वाचलं आणि ऐकलं आहे ते सर्व खोटं आहे. कोणीही खेळापेक्षा मोठं नाही. कोणाचाही आदर या सर्वात मोठा आहे. कोणावर वैयक्तिक टीका आणि असभ्य भाषेत बोलणं योग्य नाही. संघातील प्रत्येकाला माहिती आहे की त्या दिवशी नेमकं काय झालं. “, असं पृध्वी राज याने लिहिलं आहे. तसेच “सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.”, असंही पुढे लिहिलं आहे.

आरोप प्रत्यारोपानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. कोण खरं कोण खोटं असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, संघातील खेळाडूंनी अध्यक्षांना पत्र लिहून हनुमाची बाजू घेतल्याचं पत्रही व्हायरल होत आहे. या पत्रावर खेळाडूंच्या सही आहेत. तसेच हनुमा विहारीने वैयक्तिक कोणतीही टीपण्णी केली नाही. तसेच ड्रेसिंग रुममधील वातावरण थोडं फार असंच असतं हे सांगण्यासही विसरले नाहीत. रणजीच्या उर्वरित सामन्यात हनुमा विहारी यानेच कर्णधारपद भूषवावं अशीही विनंती केली आहे. हे पत्र खुद्द हनुमा विहारी याने पोस्ट केलं आहे.

हनुमा विहारीने काय आरोप केला?

‘बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी १७व्या खेळाडूला ओरडले आणि त्याने त्याच्या वडिलांकडे (जो नेता आहे) तक्रार केली, त्या बदल्यात त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले. बंगालविरुद्ध आम्ही ४१० धावांचे आव्हान ठेवले असले तरी, कोणतीही चूक न करता मला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले.”, असा आरोप हनुमा विहारी याने केला.