मुंबई : क्रिकेट स्पर्धेत कधी काय होईल हे सांगता येत नाही. सामना कोणत्याही क्षणी कलाटणी घेतो, असं अनेकदा चित्र पाहिलं गेलं आहे. जिंकणारा सामना गमावताना आणि गमावणारा सामना जिंकताना पाहिलं गेलं आहे. कधी पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेऊन विजयाचं स्वप्न धुळीस मिळताना पाहिलं आहे. दुसरीकडे कुत्रे, पक्षी किंवा इतर कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आल्याचं पाहिलं गेलं आहे. असाच काहिसा प्रकार लंका प्रीमियर लीगमध्ये पाहिला गेला. लंका प्रीमियर लीग 2023 चा दुसरा सामना गाले टायटन्स आणि दंबुला ऑरा यांच्यात रंगला असताना ट्वीस्ट आला. कारण मैदानात नागिण घुसल्याचं दिसून आलं. हा प्रकार घडला तेव्हा दांबुलाचा संघ फलंदाजी करत होता.
क्रिजवर धनंजय डिसिल्वा आणि कुसल परेरा उपस्थित होते. चौथी ओव्हर संपताच सामना थांबवण्यात आला. पहिल्यांदा काय झालं हे लक्षात आलं नाही. कॅमेरामनने कॅमेरा फिरवताच सर्व चित्र स्पष्ट झालं. नागिण मैदानाबाहेर काढणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यामुळे मैदानाबाहेर जाण्यासाठी वाट पाहावी लागली.अखेर सीमेपार गेल्यानंतर पुन्हा सामना सुरु करण्यात आला.
लंका प्रीमियर लीग स्पर्धेत नागिणीची एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा खेळाडू दिनेश कार्तिक यानेही याबाबत मजेशीर ट्वीट केलं आहे. “मला वाटलं नागिणची एन्ट्री बांगलादेशमध्ये झाली आहे.”
The naagin is back
I thought it was in Bangladesh ?????#naagindance#nidahastrophy https://t.co/hwn6zcOxqy
— DK (@DineshKarthik) July 31, 2023
मैदानात साप घुसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरु असताना सापाने एन्ट्री मारली होती. त्यावेळेस सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता. आता साप मैदानात घुसू नये यासाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते.