बोयसर | 2 डिसेंबर 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोण जिंकेल यावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन मारहाणीत होऊन 23 नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दुदैर्वी तरुणाचे नाव प्रवीण राठोड असे असून या प्रकरणात बोयसर पोलिस ठाण्यात चार जणांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्यापही पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने पोलिसांच्या विरोधात बंजारा टायगर्स संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना सुरू असताना बोयसर येथील चित्रालय परिसरातील संतोष हेअर सलूनमध्ये पीडीत प्रवीण राठोड आणि आरोपी मनोज गिरी व प्रतीक होते. तेथे मोबाइलवर क्रिकेट सामना बघत असताना आरोपींनी ‘तुम्हारा इंडिया हार जाएगा’ असा वाद घातला. त्यावरुन त्यांच्यात प्रचंड हाणामारी झाली. यावेळी आरोपींनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून राठोडला बेदम मारहाण केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना कोण जिंकेल ? यावरुन बोयसरच्या चित्रालय परिसरातील ‘संतोष हेअर सलून’ मध्ये बसलेल्या चारपाच तरुणात वाद झाला. यावेळी प्रवीण राठोडला आरोपी मनोज गिरी आणि प्रतिक याने चिडविले. त्यातून शिवीगाळ करण्यात आली. आरोपी तरुणांनी आपल्या साथीदारांना बोलावून राठोड याला बेदम मारहाण केली. यावेळी ‘सलून’ मधील खुर्चीचा एक भाग काढून त्याने राठोड याच्या डोक्यावर प्रहार केल्याने राठोड गंभीर जखमी झाला. त्यानंतर राठोड याला उपचारासाठी प्रथम बोयसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची स्थिती अधिक गंभीर झाल्याने त्याला मीरारोड येथील तुंगा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी राठोड याच्या नातेवाईकाने बोयसर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मनोज गिरी, प्रतीक गिरी व अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरोधात कलम 302 ( 34 ) अन्वये हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.