मुंबई : दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स क्रिकेटविश्वात मिस्टर 360 नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या फलंदाजीचे क्रीडाविश्वात अनेक चाहते आहेत. 2004 साली एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीने क्रीडारसिकांना मोहित करून टाकलं. त्याने 114 कसोटी, 228 वनडे आणि 78 टी20 सामने खेळले आहेत. दक्षिण अफ्रिकेसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने 20014 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याचा आक्रमक फलंदाजीचं दर्शन वारंवार झालं. पण क्रिकेट कारकिर्द एकदम टॉपला असताना एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय आणि 2021 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. पण या निवृत्तीमागचं खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याच्या पाच वर्षानंतर त्याने याबाबत खुलासा केला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने तडकाफडकी निवृत्ती घेण्याचं खरं कारण सांगितलं आहे. या निवृत्तीमागे त्याचा लहान मुलाची कृती महागात पडल्याचं स्पष्ट केलं आहे.
“माझ्या मुलाने चुकून माझ्या डोळ्यावर लाथ मारली. त्यामुळे माझ्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमी होण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांनी सर्जरी केल्यानंतर सांगितलं की, तुम्ही अशा पद्धतीने कसं क्रिकेट खेळू शकता. पण सुदैवाने माझा डावा डोळा व्यवस्थितरित्या काम करत होता. त्यामुळे शेवटची दोन वर्षे मी डाव्या डोळ्याच्या मदतीनेच क्रिकेट खेळलो.”, असं एबी डिव्हिलियर्सने सांगितलं. 2015 वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीत पराभूत करणं खरंच धक्कादायक होतं हे सांगण्यासही तो विसरला नाही. तसेच कोविडवेळीही काही आव्हानांचा सामना करावा लागला हे देखील त्याने पुढे सांगितलं.
“कोरोना काळात माझ्यावर परिणाम झाला हे काही वेगळं सांगायला नको. 2015 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पराभव जिव्हारी लागला. त्यातून सारवण्यासाठी काही वेळ लागला. पण जेव्हा मी संघात परतलो तेव्हा आश्वासक सुरुवात करणं गरजेचं होतं. ” असंही एबी डिव्हिलियर्स याने पुढे सांगितलं.
“मी खूप विचार केला. खरंच आता मला थांबायला हवं का? मला आयपीएल किंवा इतर स्पर्धा खेळायला हवी की नको. मी 2018 मध्ये थांबलो. त्यानंतर मी कसोटीत खेळण्याचा प्रयत्न केला. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यानंतर मी थांबण्याचा निर्णय घेतला. “, असं एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला.