आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी दहा संघांमध्ये खेळाडू रिटेन करण्याासोबत कोणाला संघात घ्यायचं याची गणित जुळवली जात आहेत. खासकरून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंची आकडेवारी आणि फॉर्म पाहिला जात आहे. कारण फॉर्मात असलेला खेळाडू कधीही सामना पालटू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराजा टी20 क्रिकेट लीग सुरु आहे.या स्पर्धेत अभिनव मनोहरने आक्रमक खेळी करत गोलंदाजांचं कंबरडं मोडलं आहे. सध्या अभिनव मनोहर गुजरात संघासोबत आहे. मात्र त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे. असं असताना त्याला रिलीज करताना फ्रेंचायझीला दहावेळा विचार करावा लागणार आहे. कारण त्याचा फॉर्म पाहता आता गुजरातला हा निर्णय घेणं कठीण जाईल. इतकंच काय तर एकदा का रिलीज केलं तर संघात घेण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे गुजरात फ्रेंचायझीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
महाराजा लीगच्या 28 व्या सामन्यात शिवमोगा लायन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमवून 227 धावा केल्या आहे. हे लक्ष्य बंगळुरु ब्लास्टर्सने 19 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. शिवमोगा लायंसची सुरुवात चांगली झाली नाही. तेव्हा मोहित बँगलोर आणि अभिनव मनोहर यांनी डाव सावरला. मोहितने 28 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. तर अभिनवने 24 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकार मारत नाबाद 59 धावा केल्या. तसेच विजयासाठी 228 धावांच लक्ष्य ठेवलं. पण बंगळुरु ब्लास्टर्सच्या मधल्या फळीतील शुभांग आणि सुरज अहुजा जोडीने विजय खेचून आणला.शुभांगने 85, तर सुरज अहुजाने 82 धावा केल्या आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला.
महाराजा ट्रॉफीत अभिनव मनोहर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 डावात 52 षटकारांच्या मदतीने 196.51 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्या आहेत. अभिनवने मागच्या नऊ डावात 52* धावा(29 बॉल), 84*(34), 5(8), 17(12), 55(36), 46(29), 70(27), 43(25) & 76*(34) केल्या आहेत. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. गुजरातने त्याला 2022 च्या लिलावात 2.60 कोटी रुपये खर्च करून संघात घेतलं होतं. त्याने 19 आयपीएल सामन्यात 16.5 च्या सरासरीने 132.76 च्या स्ट्राईक रेटने 231 धावा केल्या आहेत. पण ही कामगिरी आणि सध्याची कामगिरी पाहता संभ्रम वाढला आहे.