भारत आणि पाकिस्तान यांच्यात एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. तसेच 20 षटकात 8 गडी गमवून 183 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान ठेवलं. पाकिस्तानने 20 षटकात 7 गडी गमवून 176 धावा केल्या. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. यासह स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रसिख दार सलाम आणि निशांत सिंधूने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताकडून अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंगने आक्रमक सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये या जोडीने 68 धावा ठोकल्या. अभिषेक शर्मा 22 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर प्रभसिमरनने 19 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार तिलक वर्माने आक्रमक खेळी केली. दोन चौकार आणि दोन षटकार मारत 44 धावा केल्या. त्याला नेहल वढेराची साथ मिळाली त्याने 22 चेंडूत 25 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज काही खास करू शकले नाही. आयुष बदोनी फक्त 2 धावा करून बाद झाला. अंशुल कंबोजला तर खातंही खोलता आलं नाही.
पाकिस्तान ए (प्लेइंग इलेव्हन): हैदर अली, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), यासिर खान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, अब्दुल समद, अराफत मिन्हास, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इम्रान, जमान खान, सुफियान मुकीम.
इंडिया ए (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रमणदीप सिंग, अंशुल कंबोज, टिळक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, निशांत सिंधू, राहुल चहर, रसिक दार सलाम, वैभव अरोरा
एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कप 2024 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ उतरले आहेत. अ गटात बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि हाँगकाँग हे संघ आहेत. तर ब गटात भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर टॉप 2 संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 25 ऑक्टोबरला होणार आहेत. तर अंतिम फेरीचा सामना 27 ऑक्टोबरला होणार आहे.